चंद्रपूर : शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि त्यांचे शिष्य सदाभाऊ खोत यांच्यात रंगलेला कलगीतुरा संपूर्ण राज्याने अनुभवला आहे. अगदी तसाच अनुभव या विधानसभेत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. या ठिकाणी ज्येष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप आणि त्यांचे शिष्य संजय धोटे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभे ठाकले आहेत.


चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघ हा राज्यातील शेतकरी संघटनेच्या चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शेतकरी संघटना या भागात नुसती चळवळ करून थांबली नाही तर तब्बल तीन वेळा शेतकरी नेते वामनाराव चटप इथून आमदार झाले. वामनराव चटप या निवडणुकीत पुन्हा एकदा स्वतंत्र भारत पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. मात्र या वेळी त्यांना शेतकरी चळवळीतील त्यांच्याच एका शिष्याने आणि कधीकाळच्या सहकार्याने निवडणुकीत आव्हान दिले आहे.

2009 पर्यंत राजुरा मतदारसंघात आमदार असलेल्या चटप यांनी विधानसभेऐवजी लोकसभेत शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याचा संकल्प केला आणि त्यामुळे त्यांनी 2009 आणि 2014 ची लोकसभा लढवली. वामनराव या दोन्ही निवडणुकीत पराभूत झाले. पण त्यांनी विधानसभा लढवली नाही आणि शेतकरी संघटनेतील इतर कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी दिली.

2009 मध्ये अॅड. संजय धोटे स्वतंत्र भारत पक्षाकडून निवडणूक लढले आणि पराभूत झाले. पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2014 च्या मोदी लाटेत आमदार झाले. या वेळी भाजपने संजय धोटे यांना पुन्हा संधी दिली आहे, मात्र यावेळी त्यांना त्यांच्या गुरुचा राजकीय प्रतिस्पर्धी म्हणूनन सामना करावा लागतोय.

एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या गुरु-शिष्याच्या या जोडीमुळे राजुरा मतदारसंघात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी चलबिचल निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे गुरु-शिष्याची ही लढाई आपल्या पथ्यावर पडेल, असा काँग्रेसला विश्वास आहे.

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वळवून संजय धोटे यांनी 2014 मध्ये भाजपला राजुरा मतदारसंघात विजय मिळवून दिला होता. मात्र आता प्रत्यक्ष वामनराव चटप मैदानात उतरल्यामुळे त्यांना कितपत यश मिळतं आणि गुरु-शिष्याच्या या लढाईत काँग्रेस बाजी मारणार का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.