नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेसनं आंदोलन छेडलं आहे. मात्र त्याचवेळी भाजप कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. यावेळी दोघांनीही एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.


मुख्यमंत्र्यांनी नागपूरमधील फेटरी हे गाव दत्तक घेतलं आहे. या गावात काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन छेडत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसविरोधात घोषणाबाजी सुरु केली. आजूबाजूला मंडप टाकत एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री कर्जमुक्तीच्या केवळ गप्पा करतात, त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही असा आरोप काँग्रेसनं केला आहे, तर मुख्यमंत्र्यांनी अल्पकर्जधारक शेतकऱ्यांना सुमारे 31 हजार कोटींची कर्जमाफी देणार असल्याचं सांगूनही काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत आहेत, त्यांना राजकारण करायचं आहे, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. फेटरी गावात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.