मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून दोन गट पडले असल्याचं चित्र आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली आणि मराठा समाजातील नेत्यांना मराठा समाजाला 20 टक्के आरक्षण म्हणजेच इडब्ल्यूएस कोट्यातून आरक्षण नको. याबाबत जो शासनाने एसइबीसीच्या आरक्षणाचा निर्णय लागेपर्यत तात्पुरत्या स्वरूपात मराठा समाजाला इडब्ल्यूएस कोट्यातून जाहीर केलं होतं त्याबाबत जीआर देखील काढला जाणार होता तो स्थगित करावा अशी मागणी केली होती.


जोपर्यत एसइबीसीचं आरक्षणाचा निर्णय होतं नाही तोपर्यत इडब्ल्यूएसचं आरक्षण लागू करण्याची भूमिका शासनाने घेतली होती. ती रद्द करावी अशी मागणी संभाजीराजे यांनी केली होती. याला विरोध करत शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी 10 टक्के आरक्षण लागू करण्याची मागणी केली आहे. यामुळे समाजातील मुलांना आणि नोकरदारांना फायदा होईल. सध्या अकरावी प्रवेश रखडले आहेत. अनेकजण भरती झाले आहेत त्यांची जॉइनिंग रखडली आहे त्यांना याचा फायदा होईल. महत्त्वाची बाब राज्य लोकसेवा आयोगाची 11 तारखेला परीक्षा आहे. जर सरकारने एसइबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या मुलांना इडब्ल्यूएसमध्ये सहभागी करून घेतलं तर निदान त्यांना तरी फायदा होईल अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांनी दिली आहे.


याबाबत तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अद्यादेश रद्द न करण्याबाबत काही सांगणार आहात का आणि सध्या जे दोन गट दिसतायत त्यांना चर्चेला बोलावणार आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना विनायक मेटे म्हणाले की, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना पत्र दिल आहे. आणि लवकरच यांची भेट देखील घेणार आहे. यासोबतच 3 तारखेला पुण्यात 'मराठा समाज विचारमंथन बैठकी'चं आयोजन केल आहे. आणि याला सर्व नेत्यांना बोलावणार आहे. छत्रपती उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांना निमंत्रण दिलं आहे. यासोबत आता उद्या संभाजी राजेंना देखील निमंत्रण देणार आहे. आणि जी मुख्य मागणी आहे याबाबत चर्चा करणार आहोत. या बैठकीला मागासवर्गीय आयोगात काम केलेले निवृत्त अधिकारी, सदानंद मोरे,अॅड. उज्वल निकम आशा मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. यासोबत समाजातील विविध संघटनांचे नेते देखील उवस्थित असतील.


सध्या अनेक प्रवेश अडकले आहेत याबाबत आता तुम्ही काय करणार आहात? याबाबत बोलताना विनायक मेटे म्हणाले की, "मेगा भरती बाबत सरकार काहीच बोलत नाही, एमपीएससी बाबत सरकार काय करणार आहे याबाबत देखील काहीच बोलत नाही. त्यामुळे सरकाने काय करायला हवं याबाबत बातचीत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊ आणि जर नाहीच काही हालचाल झाली तर पुन्हा एकदा राज्यभरात आंदोलन करू".