पंढरपूर : सहकाराची पंढरी अशी सोलापूर जिल्ह्यात ओळख असलेल्या अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील बँकेत 27 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा करीत लेख परीक्षक गोकुळ बंकटलाल राठी यांनी अकलूज पोलिसात तक्रार दाखल केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी 1975 साली स्थापन केलेल्या या बँकेत घोटाळा झाल्याची तक्रार अकलूज पोलिसांनी दाखल करून बँकांच्या अकलूज , टेम्भूर्णी , करमाळा , इंदापूर , सोलापूर आणि पुणे या शाखांत हा 27 कोटी 6 लाख 19 हजार 814 रुपयांचा घोटाळा झाल्याचे दिल्यावर अकलूज पोलिसांनी या सर्व शाखांच्या बँक व्यवस्थापकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा सर्व प्रकार आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी द्यावा लागणार असल्याने अकलूज पोलिसांनी हा गुन्हा सोलापूर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यासाठी पत्र दिले आहे .
या सर्व प्रकारामुळे खातेदार आणि ठेवीदारांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाल्याने बँक व्यवस्थापन देखील गंभीर झाले. या लेख परीक्षकाच्या विरोधात अकलूज पोलिसात तक्रार दाखल करायची तयारी केल्याचे मुख्य व्यवस्थापक नितीन उघडे यांनी माझाशी बोलताना सांगितले. दरम्यान या पद्धतीचा कोणताही घोटाळा आमच्या कोणत्याही शाखेत झालेला नसून सर्व ठेवीदारांचे आणि खातेदारांची पैसे सुरक्षित असल्याचा दावा बँक व्यवस्थापनाने केला आहे. सदर लेखा परीक्षकाने कोणताही अहवाल बँकेला दिलेला नसून तो संचालक मंडळाच्या समोरही आलेला नाही. या लेखा परीक्षकाने एकही बँक शाखेत येऊन माहिती घेतली नसून सर्व कागदपत्रे मेल करून मागवून घेतल्याचेही व्यवस्थापक उघडे यांनी सांगितले. आता सहकार आयुक्तांकडे दुसऱ्या लेखा परीक्षकांकडून बँकेचे लेखा परीक्षण करण्याचा अर्ज सहकार विभागाला दिला जाणार असल्याचेही उघडे यांनी सांगितले. बँकेच्या या भूमिकेमुळे या सर्व प्रकरणात वेगळाच ट्वीस्ट आला असून आज सर्वच शाखांचे व्यवहार नियमितपणे सुरु असल्याचे दिसत होते.
कोणत्या शाखेत काय घोटाळा आहे याबाबत कोणताही खुलासा पोलीस तक्रारीत दिला नसल्याचे पश्चिम महाराष्ट्र लेखा परीक्षक संघटनेचे अध्यक्ष अशोक तडवलकर यांनी सांगितले आहे. अकलूज येथील सहकार महर्षी बँकेला राज्याचा परवाना असून 1975 साली परवानगी मिळाल्यावर 1978 सालापासून बँक सुरु करण्यात आली. या बँकेची मुख्य शाखा अकलूज येथे असून इतर 9 शाखा राज्यात आहेत . या बँकेकडे 103 कोटी रुपयांची डिपॉझिट असून 65 कोटीचे कर्जवाटप आहे . सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील बँकेची एकूण उलाढाल 183 कोटी रुपयाची असल्याने या गुन्हा दाखल केल्याने सभासदांनी अजिबात न घाबरण्याचे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे .