मुंबई : भीमा कोरेगाव येथील हिंसाचारात नुकसान झालेल्यांना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार या हिंसाचारातील नुकसानग्रस्तांना संपूर्ण भरपाई देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली.


नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त अन्य घटनांमधील आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीत भीमा कोरेगाव दंगलीतील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला.

भीमा कोरेगावला झालेल्या हिंसाचारात सात कोटी 97 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अहवाल पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला पाठवला होता. त्यानुसार या नुकसानीची रक्कम लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यांच्यामार्फत नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात ती जमा करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.