कोल्हापूर : 'एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, उसके बाद तो मैं खुद की भी नहीं सुनता' असं म्हणणाऱ्या सलमान खानने कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूरकरांना दिलेली कमिटमेंट अजून पूर्ण केली नाही. महापुराला एक वर्ष झाल्यानंतर सलमान खानने दत्तक घेतलेल्या गावाची काय अवस्था आहे, याची आढावा घेऊया.
कोपेश्वर मंदिरामुळे जगप्रसिद्ध असलेले खिद्रापूर गेल्या वर्षीच्या महापुरात पूर्णपणे उध्वस्त झाले. यानंतर दिलदार असलेला भाईजान सलमान खानने खिद्रापूर हे गाव दत्तक घेतलं. गावात अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे. नागरिकांना राहण्यासाठी घरं नाहीत. अशात सलमान खानने गाव दत्तक घेतल्यानंतर मोठ्या उत्साहात त्याचं स्वागत झालं. खिद्रापूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र या सगळ्या गावकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरलं. यंदाचा पावसाळा सुरू होऊन नदीने पात्र देखील सोडलं मात्र अद्याप खिद्रापूर गावतील लाभार्थ्यांना घर बांधून मिळाले नाही.
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि सलमान खानच्या हुमन बिईंग संस्थेने पुढाकार घेतला. सुरुवातीला सर्व्हे करून लाभार्थ्यांची यादी तयार केली. 300 स्क्वेअर फुटाचे घर बांधून देऊ, असं आश्वासन दिलं. मात्र त्यामध्ये बदल करून देखील अद्याप घरांना मुहूर्त मिळाला नाही. समितीमधील सदस्यांकडून मात्र उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.
सलमान खान घर बांधून देणार म्हटल्यानंतर अनेकांनी घरं पडक्या अवस्थेत ठेवली. ज्यांना सरकारचे 95 हजार नुकसान भरपाई मिळाली होती. त्यांनी थोडीशी डागडुजी केली आणि संसार सुरू केला. पण सरकारचे पैसे संस्थेकडे जमा करतील त्यांनाच याचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जर आमचेच पैसे घेऊन सलमान घर बांधून देत असतील तर मग सलमानचं नाव कशाला असा प्रश्न गावकऱ्यांनी केला.
खरंतर या सगळ्या प्रकारात समन्वयाचा अभाव पाहायला मिळतो. नागरिकांना आधी दिलेले आश्वासन आणि करार करताना घातलेल्या अटी या वेगळ्या पाहायला मिळत आहेत. सलमान खान प्रत्येक सामाजिक कार्यात पुढे दिसत असतो तर मग दत्तक घेतलेल्या गावाची अशी अवस्था का हा देखील प्रश्न आहे.