मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा, कर्नल प्रसाद पुरोहितसह अन्य पाच जणांवर आरोप निश्चित केला आहे. सातही आरोपींवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. त्याचबरोबर हत्या आणि अन्य आरोपही प्रविष्ट केले आहेत.

साध्वी प्रज्ञा आणि पुरोहितसह समीर कुलकर्णी, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी या सात आरोपींवर यूएपीए आणि आयपीसीच्या तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे. सातही आरोपींनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळलेत. या प्रकरणातील रामचंद्र कालसंग्रा आणि संदिप डांगे हे दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. एप्रिल 2017 मध्ये या सातही आरोपींना मुंबई हायकोर्टाने जामीन दिला होता.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर आज सुनावणी होण्यापूर्वी सुप्रीम कोर्टात कर्नल पुरोहितच्या वतीने करण्यात आलेल्या अर्जावर युक्तिवाद झाला. पंरतु एनआयएचे न्यायाधीश विनोद पाडलकरांनी अपील अर्ज फेटाळत आरोप निश्चित करत प्रक्रिया पूर्ण केली.

नाशिक जिल्हातील मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता, ज्यात 6 जणांचा मृत्यू आणि 101 जण जखमी झाले होते. हा स्फोट रमजानमध्ये करण्यात आला, त्यावेळी मशिदीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सुरुवातीला या कारवाईमागे इस्लामी दहशतवाद्यांचा हात असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र तपासानंतर या बॉम्बस्फोटात हिंदू संघटनांचा हात असल्याचं समोर आलं.