बीड: आजवर आपण सामुहिक विवाह सोहळे पाहिले असतील पण बीडच्या झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठानतर्फे 171 मुलींचा सामुहिक नामकरण विधी पार पडला आहे. चार भिंतीच्या आत होणारा हा कौंटुंबिक सोहळा पहिल्यांदाच ,सार्वजनिक व्यासपिठावर साजरा झाला. यानंतर सर्वांना खाऊ आणि चिमुकल्यांना खेळणीही वाटली गेली. मुलीच्या जन्माचं सेलेब्रेशन इतक्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतं या विचाराने अनेक मातांच्या पापण्याही ओलावल्या आहेत.


मागील तेरा वर्षापासून बीड शहरात स्व.झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठान तर्फे राज्य स्तरीय कीर्तन महोत्सवाचं आजोजन केलं जातं, या वर्षी खटोड प्रतिष्ठानकडून नुकत्याच जन्मलेल्या मुलींच नामकरण सोहळा भरवण्याचा संकल्प सोडण्यात आला. या नामकरण सोहळ्यात मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील महिलांनीदेखील सहभाग नोंदविला.

2011 च्या जनगणनेनुसार बीडमध्ये मुलींची संख्या सर्वात कमी आहे असं समोर आलं. त्यामुळे अशा उपक्रमांनी जर मुलींच्या जन्माचं स्वागत होणार असेल, तर समाजातला मुलींचा टक्का नक्कीच वाढेल, अशी चर्चा अता सुरु झाली आहे.

एकीकडे दंगलसारख्या सिनेमांमधून आपण मुलींच्या सक्षमीकरणाविषयी मोठी चर्चा होते.पण खरं सक्षमीकरण मुलींच्या जन्मापासूनच झालं तरच त्या उमलत्या कळ्यांचं भविष्य अधिक सुगंधित होईल यात शंका नाही.