Ratnagiri–Sindhudurg Lok Sabha : हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये दिलेला उमेदवार बदलण्याची नामुष्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आल्यानंतर आता नाशिक ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आपल्याकडेच राखण्यासाठी शिंदेंची चांगलीच दमछाक होणार आहे. या जागांवर भाजपने थेट दावा केल्याने एकनाथ शिंदे यांची गोची झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट दावा करताना निवडणुकीच्या रिंगणात उतण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, याच ठिकाणी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये शीतयुद्ध सुरू
गेल्या काही दिवसांपासून त्यांनी सुद्धा भेटीगाठींचे सत्र अवलंबलं आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे संकेत दिले होते. मात्र, असं असूनही रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये शीतयुद्ध सुरू झालं आहे का? अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून बुध मेळावे आयोजित करण्यात आल्यानंतर आता रत्नागिरी शहरात सुद्धा शिवसेनेकडून मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे एकमेकांविरोधात कुरघोडी करण्याचे राजकारण सुरू झालं नाही ना? अशी सुद्धा चर्चा मतदारसंघांमध्ये रंगली आहे. किरण सामंत यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे ट्विट केलं होतं. मात्र, त्यानंतरही या घडामोडी घडत असल्याने या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. मेळावा उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी दावा केला असला तरी शिवसेनेने अजूनही या मतदारसंघातील आपला दावा कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. किरण सामंत यांना उमेदवारी देण्यात यावी याबाबत कार्यकर्ते अजूनही आक्रमक आहेत. त्यांना उमेदवारी मिळेल असा आशावाद कायम आहे.
चार खासदारांचा पत्ता जवळपास कट झाल्यात जमा
दुसरीकडे जागावाटपामध्ये एकनाथ शिंदे यांना मोठी तडजोड करावी लागली आहे. ज्या खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता त्यापैकी आता चार खासदारांचा पत्ता जवळपास कट झाल्यात जमा आहे. नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. यवतमाळ वाशिम मधून भावना गळवी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. हिंगोलीमधून हेमंत पाटील यांना उमेदवारी देऊन सुद्धा उमेदवार बदलाची वेळ एकनाथ शिंदे यांच्यावर आली.
ठाण्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपने त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. मात्र, शिंदे यांचा हा बालेकिल्ला असल्याने ते कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ सोडण्यासाठी तयार नाहीत. त्यांच्याकडून तीन नावांची चर्चा सुरू असली तरी त्यांना इलेक्टिव्ह मेरिटच्या नावाखाली भाजपने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. भाजपने डॉ. संजीव नाईक यांच्यासाठी दबावाचं राजकारण सुरू केलं आहे.
कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे खासदार असून सुद्धा त्यांची उमेदवारी आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही. कल्याणच्या बदल्यात ठाणे भाजपच्या वाट्याला जाण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे उमेदवार बदलानंतर मतदारसंघ सुद्धा राखण्यासाठी शिंदे यांची मोठी दमछाक सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या