मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुन्हा जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री आज रात्री 8.30 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. त्यामुळे आज मुख्यमंत्री नेमकं कोणत्या मुद्द्यावर बोलतील याची उत्सुकता सर्वांना आहे. लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करतील का? लॉकडाऊन उठवण्याची घोषणा करतील का? जिल्हाबंदी उठवतील का? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे रात्री 8.30 ला मिळतील. 


मुख्यमंत्री लॉकडाऊन बाबत महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन वाढणार हे जवळपास निश्चित आहे, मात्र ज्या भागात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे तिथे शिथिलता दिली जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवला तरी तो कशा प्रकारे असेल याची घोषणा मुख्यमंत्री करु शकतील.


लॉकडाऊनमुळे व्यापारी अडचणीत, येत्या 1 जूनपासून सर्व प्रकारचा व्यापार सुरू झालाच पाहिजे; व्यापारी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार?


राज्यातील व्यापारी संघटनेने 1 जूनपासून व्यापार, दुकाने सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्याबद्दल काय निर्णय घेतील, याकडेही व्यापाऱ्यांचे लक्ष आहे. दुकाने, व्यवसाय बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. यामुळेचे येत्या 1 जूनपासून सर्व प्रकारचा व्यापार सुरु झालाच पाहिजे अशी मागणी ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ चे राष्ट्रीय संगठन मंत्री व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे वरीष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली होती. 


Lockdown Extended : महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला, जिल्हाबंदी 10 जूननंतर उठण्याची शक्यता


राज्यात 1 जूननंतरही लॉकडाऊन वाढवला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिले होते. राज्यात 1 जूननंतरही निर्बंध कायम ठेवले जातील. त्याबाबत मंत्रिमंडळाचं एकमत झालं असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होतं. लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.  काही जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्णसंख्या बघता आता असलेले निर्बंध तसेच ठेवावे असे मत आरोग्य विभागाने मांडले होते. पण काही विभागांनी निर्बंध शिथिल करावे अशीही भूमिका मांडली होती. त्यामुळे राज्यातील जिल्हाबंदी ही 10 जून नंतरच उठण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 जूनपासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


राज्यातील कोरोनाची कालची स्थिती


राज्यात काल 20,295 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 443 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर हा 1.65 टक्के एवढा झाला आहे. राज्यात काल 20,295 नवीन रुग्ण सापडल्यानंतर सद्यस्थितीत 2,76,573 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57,13,215 झाली आहे.