मुंबई : ईडी वगैरेचा गैरवापर करुन दबाव आणत असाल तर याद राखा. मुलाबाळांच्या मागे लागून विकृत आनंद मिळवणाऱ्यांनो तुम्हालाही कुटुंबं आहेत. मुलंबाळं आहेत हे विसरु नका. पण आमच्यावर संस्कार आहेत म्हणून संयम ठेवला आहे, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या एक वर्षपूर्तीनिमित्त सामनाला मुलाखत दिली. शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी वर्षा ते मातोश्री, काँग्रेस-राष्ट्रवादीशी समन्वय, विरोधकांचे आरोप, सरकार चालवतानाची कसरत यासंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.


उद्धव ठाकरे म्हणाले की, मी शांत संयमी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी नामर्द आहे. ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबियांवर हल्ले सुरु झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे आणि तुम्ही कुटुंबियांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना कुटुंबं आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हालाही कुटुंबं आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.


तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही नावं देतो, आमच्याकडे नावं आहेत. मालमसाला तयार आहे. पण सुडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या. सुडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढू, असाही इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हात धुवा पलिकडे काय सांगणार? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, ठिकय, हात धुतोय, जास्त अंगावर आले तर हात धुवून मागे लागेल. विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करु नका. विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळतं तेव्हा मला अधिक स्फूर्ती येते. कुणी कितीही आडवं आलं तर आडवं येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढं जाईल, असं ठाकरे म्हणाले.