मुंबई : गेल्या काही दिवसाता राज्यात भाजप आणि शिवसेनेची जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरु होती. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील नेत्यांना एकमेकांना मित्र म्हटलं होतं. यानंतर वेगळीच राजकीय चर्चा रंगू लागली होती. आता शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. शिवसेना आणि भाजपमधील जवळीक याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांना विचारलं असता, कुठेही जात नसल्याचे त्यांनी सांगितले.


सरकार पडणार का? तुम्ही भाजपबरोबर जाणार अशी चर्चा आहे? या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 30 वर्ष एकत्र होतो तेव्हा काही झालं नाही आता काय होणार? माझ्या एका बाजूला हे (बाळासाहेब) बसलेत, तर दुसर्‍या बाजूला हे (अजित पवार) बसलेत मी कुठे कसा जाणार? 30 वर्ष एकत्र होतो तेव्हा काही झालं नाही आता काय होणार."



खरंतर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे या चर्चेला हवा मिळाली. संजय राऊत यांनी अलीकडेच भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंधाची तुलना अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्याशी केली होती. त्यांनी म्हटलं की, शिवसेना आणि भाजपमधील मैत्री आमिर खान आणि किरण राव यांच्याप्रमाणे अबाधित राहील. दोन्ही पक्षांचे मार्ग भिन्न आहेत पण आम्ही मित्र आहोत.


दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की शिवसेनेत काही मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही. दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे का? असे विचारले असता फडणवीस म्हणाले होते की परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल.


परिस्थिती निवळल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ : मुख्यमंत्री


महाराष्ट्राच्या विधानसभेला अध्यक्ष कधी मिळणार? या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, सध्या कोरोना परिस्थितीमुळे निवडणूक घेणे शक्य झाले नाही. परंतु कोरोना परिस्थिती आटोक्यात येईल तेव्हा निवडणूक घेऊ. या संदर्भात मी राज्यपालांना देखील कळवलं आहे.