मुंबई :  आज दुपारी 1.30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. दसरा मेळाव्यातील भाषणानंतरचा त्यांचा हा थेट संवाद असणार आहे. फेसबुक, ट्विटर लाईव्ह यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. आजच्या भाषणात येणारी दिवाळी, अर्णब गोस्वामी प्रकरण, शेतकरी मदत, राज्यातील कोरोनाची स्थिती बिहार निवडणुकीचे पोल्स या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.



सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या राज्यभर गाजत असलेला मंदिरं उघडण्याच्या विषयावर ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष लागून आहे. महाराष्ट्रातली मंदिरं कधी उघडणार असा प्रश्न भाजपा आणि मनसेने वारंवार केला आहे.  इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्याबाबत ते काय भाष्य करतात याकडेही लक्ष लागून आहे. तसेच वाढीव वीजबिलांच्या संदर्भात राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं म्हटलं होतं. यावर मुख्यमंत्री काही बोलतील का याकडेही लक्ष लागून आहे.

आज राज्यातील जनतेला संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध उपक्रमांचं लोकार्पण करणार आहेत. दुपारी 3 वाजता ते मीरा भाईंदर येथील विविध विकास कामांचे ऑनलाईन भूमिपूजन व लोकार्पण करणार आहेत. तर श्री बाळासाहेब ठाकरे कलादालन, कोविड रुग्णालय आदींचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच दुपारी 3.45 वाजता नंदुरबार प्रशासकीय इमारतीचे ऑनलाईन कोनशिला अनावरण करणार आहेत. तर सायंकाळी 4.45 वाजता  कल्याण, टिटवाळा येथील कोविड रुग्णालयांचा ऑनलाइन लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.