मुंबई : दिवाळीत फटाकेबंदीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. फटाकेबंदीबाबत बोलताना ते म्हणाले की, फटाक्यांवर बंदी आणता येईल, परंतु स्वत:हुन आपण बंधन घालून घेऊ शकतो का? अनेकजण म्हणतात तुम्ही बोलताना कुटुंबप्रमुखासारखे, मोठ्या भावासारखे वाटता, मग त्या नात्याने मी विनंती करतो. फटाकेबंदी पेक्षा प्रदूषण करणारे फटाके टाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. डॉक्टर्स, अन्य यंत्रणा यांच्यावर खूप ताण आहे. हे ते कुणासाठी करत आहेत? तुमच्यासाठीच ना? आपली आजवरची मेहनत प्रदूषणामुळे व्यर्थ जायला नको, असं ठाकरे म्हणाले.
ते म्हणाले की, बंदी आणून मी तुमच्यावरआणीबाणी नाही आणत आहे. एक दुसर्याच्या विश्वासावर हा आनंद, सण साजरा करू. अन्य ठिकाणी प्रदुषण अधिक आहे. कोरोना आजार श्वसन संस्थेशी निगडित आहे. प्रदुषणामुळे जर हा आकडा वाढत असेल तर दिवाळीत आपण फटाके वाजवणं थांबवू शकतो का? आपण जिद्दीने हा आलेख खाली आणला आहे. आपल्याकडे मुंबईत हजाराचा आकडा शेकड्यात आला आहे, राज्यातही नियंत्रणात आला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
CM Uddhav Thackeray : दिवाळीनंतर नियमावली तयार करुन मंदिरं उघडणार : मुख्यमंत्री ठाकरे
ते म्हणाले की, 100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्ल्यू आला होता. त्याही वेळेला काही कोटी बळी गेले होते. असं म्हणतात आपल्या देशात 1 कोटींच्या आसपास लोक बळी गेले होते. तेव्हाची लोकसंख्या काय होती? मी घाबरवत नाही परंतु सतर्कतेची आवश्यकता आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
ते म्हणाले की, अनेक ठिकाणी आकडा शून्यावर येऊन पाश्चिमात्य देशात परत वाढला. इटली, इंग्लंड, स्पेन अनेक देश पाहा. काही ठिकाणी तर घरातही मास्क घालणे बंधनकारक आहे. परत लॉकडाऊन केला आहे. दुसरी लाट ही लाट नाही त्सुनामी आहे. आपल्याकडे होणार नाही, होऊ द्यायचं नाही, असं ते म्हणाले.