मुंबई : शंभर टक्के शेतीवर उपजीविका असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार, असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. शिवाय शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी 15 जिल्ह्यात चार हजार कोटीचे प्रकल्प उभारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.


'मी मुख्यमंत्री बोलतोय' या क्रार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. तसेच कर्जमाफी संदर्भात राज्यातील शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली.

शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्री म्हणाले की, ''ज्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे, त्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे या कर्जमाफीनंतर नव्याने पीक कर्ज घेणाऱ्यासाठी सवलतीच्या दरात ते उपलब्ध करुन देऊ,'' असे अश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले की, ''शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी 15 जिल्ह्यांत चार हजार कोटीचा प्रकल्प उभारणार आहोत. याशिवाय

यांत्रिकीकरणातून उत्पादनवाढीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे क्लस्टर ही तयार करणार','' असं त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, या कार्यक्रमाचा पहिला भाग गेल्या रविवारी प्रसारित झाला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली होती. शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक कर्जमाफीनं 36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली होती.

तसेच कर्जमाफीचा गैरफायदा रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. याचाच पुनरुच्चा आजच्या कार्यक्रमात पाहायला मिळाला.