पुणेः महाराष्ट्र राज्य पोलीस 14 व्या कर्तव्य मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर ई-कम्प्लेंट सिस्टीमचं अनावरण करण्यात आलं. यापुढे घरबसल्या राज्यातील कोणत्याही पोलीस स्थानकात तक्रार करता येणार आहे. मात्र त्याआधी हा प्रयोग पुणे आणि नंतर राज्यभरात  राबवण्यात येणार आहे.

 

 

ही देशातील पहिली एवढी टेक्नोसॅव्ही सिस्टम आहे. मुख्यमंत्र्यांनी  नागपूर पोलीस स्टेशनमधे 1 तक्रार  दाखल  केली. तिकडच्या पीआयने तक्रार ऑनलाइन  नोंद झाल्याचा कॉल केला आणि या प्रायोगीक  सेवेची सुरूवात झाली.

 

काय आहे ई-कम्प्लेंट सिस्टीम?

महाराष्ट्र पोलिसांच्या www.mhpolice.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आता घरबसल्या तक्रार नोंदवता येणार आहे. पुणे शहरात ही सुविधा सध्या प्रायोगीक तत्वावर राबविण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यभरात या सेवेची सुरुवात करण्यात येणार आहे. पुण्यातील ई-कम्प्लेंट सुविधेतील त्रुटी लक्षात घेण्यात येणार आहेत. त्यात सुधारणा करुन ही सुविधा राज्यभर राबविण्यात येईल. इंटरनेट सेवेचा वेगही वाढविण्यात येणार असून तो 10 एमबीपीएस करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

 

रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 2 मध्ये 14 व्या महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्यातील विजेत्यांच्या पारितोषिक वितरण सभारंभात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी 15 मोबाईल फॉरेन्सीक इन्वेस्टिगेशन व्हॅनला हिरवा झेंडा दाखविला. आगामी काळात आणखी 20 व्हॅन देण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक व्हॅन देण्याचा प्रयत्न असेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.