मुंबई : उद्यापासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधीवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या आधी सरकारच्या चहापानावर विरोधकांनी आज बहिष्कार घातला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कडक शब्दात उत्तर दिले असून त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केलीय. "आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता. परंतु, दाऊदची बहीण हसीना पारकरला चेक दिलेले त्यांचे सहकारी मंत्री जेलमध्ये गेले, त्यांनी देशद्रोह केला. परंतु, त्यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळं बर झालं ते चहापानाला आले नाहीत. नाही तर आम्हाला त्यांच्या सोबत चहा प्यायला लागला असता, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
उद्यापासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. "सत्तेतून बाहेर गेल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांनी माझ्या निष्ठेवर प्रश्न निर्माण केला. मात्र त्यांनी एकाच दिवसात तीन वेळा भूमिका बदलली. मी तर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे. हे कधीपासून कडवट शिवसैनिक झाले? सभागृहात त्यांचा आम्ही समाचार घेऊच. नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवलं, केतकी चितळेला तुरूंगात टाकलं, कंगना रणौतचं घर तोडलं. गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीस यांना तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, आमच्यावर आता खोटेनाटे आरोप करत आहेत. आम्हाला लोकांचं प्रेम मिळत आहे, त्यामुळे अजित पवार यांच्या पोटात दुखत आहे. वर्षा बंगल्यावर लोक भेटायला आल्यानंतर त्यांना चहापाणी द्यायला पाहिजे का नको? ही आपली संस्कृती आहे. परंतु, यावरून अजित पवार आरोप करत आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "लोकांची नाराजी आहे म्हणून एवढे सरपंच निवडून आले का? रोज कानाकोपऱ्यात प्रवेश होत आहे म्हणून त्याचं पोट दुखतंय. माझं कुटुंब माझी जबाबदारी यावर किती खर्च केला त्यांनी. त्यांच्या काळात 245 कोटी रूपये खर्च केला होता. यातील त्यांच्या वैयक्तीक जाहिरातीसाठी सहा कोटी रूपये वापरले. मात्र बोंबाबोंब झाल्यावर त्यांनी माघार घेतली. दोन वर्ष वर्षा बंगला बंद होता. त्यामुळे लोक येतात, आलेल्या लोकांना चहा देतो, आम्ही बिर्याणी देत नाही. तुम्ही 70 हजार कोटी रुपये सिंचनाचे बुडवले आहेत. त्याचा ही हिशोब द्यावा लागेल, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या