CM Eknath Shinde on Worli Hit And Run Accident: मुंबई : वरळीत (Worli News) शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलानं आपल्या भरधाव महागड्या बीएमडब्ल्यू कारनं (White BMW Car) महिलेला चिरडलं (Heat And Run) आणि तिथून फरार झाला. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Group) उपनेत्याला ताब्यात घेतलं आहे. तर त्याचा मुलगा फरार मिहीर शहा याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणानं देश हादरला होता. अशातच देशाच्या आर्थिक राजधानीत घडलेल्या अपघातानंतर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. वरळीतील हिट अँड रन प्रकरणात कुणालाही अभय दिले जाणार नाही. कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक दिला जाईल, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. 


शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "वरळीतील हिट अँड रन प्रकरणात कुणालाही अभय दिले जाणार नाही. कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक दिला जाईल. मग तो कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता असो. सरकार आणि कायद्यापुढे सर्व समान असल्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे वरळीत घडलेल्या घटनेला आम्ही काही वेगळा न्याय देणार नसून जे होईल ते कायद्यानुसारच होईल. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे."


"अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी सरकार आणि गृह विभाग नक्कीच योग्य त्या उपाययोजना करतील, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मुख्यमंत्री आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून  नुकतेच ते नागपूर विमानतळावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 


"सध्या घडीला विरोधी पक्षाकडे कुठलेही काम राहिले नाही. त्यामुळे या घटनेमध्ये असं समजण्याचं कुठलंही कारण नाही की, कोण कोणाला पाठीशी घालत आहे. तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी सर्वांना समान न्याय देण्याची आमची मनीषा आहे. राज्यातलं सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. कोणी कितीही आरोप केले तरी त्यात फार अर्थ नाही.", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 


नेमकं काय घडलं? 


मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी मासांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवऱ्याचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. नवऱ्यानं प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही. अचानक झालेल्या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता. चालकानं गाडी पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कोळी महिलेला फरफटत नेलं. या अपघातात नवरा थोडक्यात बचावला. मात्र, महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषिक केलं.