Rupali Patil : राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची आज नागपुरात भेट घेतली. त्यांच्या या भेटीची सध्या सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली आहे. पुण्यातील कसबा मतदार संघातील जागा लढवण्यास मी इच्छूक आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे. मात्र खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करा, अशी मागणी करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यासंदर्भातील सगळे पुरावेही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केले आहेत. 


राहुल शेवाळे यांच्यावर एका तरुणीने बलात्कार आणि अत्याचाराचा आरोप केला होता. त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच पेटला होता. या तरुणीचे दाऊदशी संबंध आहे, असंदेखील राहूल शेवाळे यांनी सांगितलं होतं. राहुल शेवाळेंवर योग्य करावाई करा, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. 


रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट करत मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी राहुल शेवाळे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. 'इथं न्याय होणारच. राहुल शेवाळे  यांनीतरुणीवर केलेल्या अत्याचाराविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री  एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांना सबळ पुरावे देऊन त्यांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. स्वर्गीय आंनद दिघे साहेबांचा वारसा सांगणारे मुख्यमंत्री महोदय यांनी पीडितेला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आहे',असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय.


... तर मी मुक्ता टिळकांच्या जागेवर निवडणूक लढवेन; रुपाली पाटील


भाजप आमदार मुक्ता टिळकांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. मुक्ता टिळकांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागणार आहे. त्यासाठी सध्या पुण्याच्या राजकीय अनेक नावांची चर्चा सुरु आहे.  रुपाली पाटील ठोंबरेंनी कसबा विधानसभा मतदार संघात मला संधी दिली तर मी लढवेन , अशी इच्छा व्यक्त केली होती.  पक्षाने आदेश दिला तर मी लढणार आहे. 2019 ची विधानसभा निवडणूक झाल्यापासून त्या आजारी होत्या मात्र त्यांनी सगळं काम चोख केलं. पोटनिवडणूक झालीच तर कोणाला निवडून द्यायचं हे मतदारांच्या हाती आहे. मात्र जर राष्ट्रवादीने मला संधी दिली  तर मी ही निवडणूक लढवण्यासाठी नक्की रिंगणाच उतरणार, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. 


राष्ट्रवादीनेच टोचले रुपाली पाटलांचे कान
रुपाली पाटील ठोंबरेंनी वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीत चर्चेला उधाण आलं  आहे. शिवाय 2019मध्ये मुक्ता टिळकांमुळे रुपाली पाटलांची जागा कापल्याचा गौप्यस्फोटदेखील त्यांनी यावेळी केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रुपाली पाटील ठोंबरेंना खडसावलं आहे. मुक्ता टिळक किंवा एखाद्या दिग्गज नेत्याचं निधन झाल्यावर त्यांचा दशक्रिया विधी होण्यापूर्वीच पोट निवडणुकीची चर्चा सुरु आहे, हे अत्यंत चुकीचं आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. पक्षातील कोणीही काहीही चर्चा करु नये. हे खपवून घेतलं जाणार नसल्याचं राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं होतं.