रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी किरण सामंत (Kiran Samant) यांना दिलेलेल्या शुभेच्छा सध्या चर्चात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. ते राजापूर तालुक्यातील रानतळे येथे आले असता किरण सामंत यांनी त्याचं स्वागत केले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. अरे किरण, काल किती फोन केले, उचलले नाहीत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना सामंतांना विचारणा केली. किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात (Ratnagiri Sindhudurg Constituency) निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. यावरुन सध्या कोकणातील वातावरण तापलेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राजापूर येथे भेट देत किरण सामंतांना एकप्रकारे पाठबळ दिल्याचं बोललं जातेय. 


आज दुपारी, राजापूर तालुक्यातील रानतळे गावातील हेलिपॅडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत दाखल झाले. हेलिपॅडच्या ठिकाणी आमदार रविंद्र फाटक आणि किरण सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी सामंतांची विचारपूसही केली. हेलीपॅडवरून मुख्यमंत्री राजापूर विश्राम गृहावर रिफायनरी विरोधकांना भेटणार आहेत.  तिथून ते शिव संकल्प अभियानाला राजीव गांधी मैदानावर जाणार आहेत.



सामंतांच्या नावाने बॅनर, शिवसेना-भाजपात तेढ - 


रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जागा लढविण्यावरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात सुरु असलेले शीतयुद्ध आता बॅनर बाजीतून स्पष्ट व्हायला लागलंय. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर सिंधुदुर्ग जिल्ह्यात झळकले आहेत. आणि त्यावर  'भावी खासदार' --- 'आता एकच लक्ष मिशन दिल्ली'  असा उल्लेख सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र हे बॅनर झळकत असून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भाजपा आणि शिंदे गटातील मतभेदाच्या चर्चा ना उधाण आलंय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. 


शिंदे गटाकडून किरण सामंतांच्या नावाची चर्चा


काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी याच जागेसंदर्भात मोठं वक्तव्य केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण किरण सामंत (Kiran Samant) यांच्या खासदारकीसाठी उमेदवारी मागितली असल्याचं उदय सामंतांनी म्हटलं. त्यांना बहुमताने निवडून आणण्याचं आवाहनही उदय सामंत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलं होतं. त्यामुळे किरण सामंत यांच्या खासदारकी लढवण्याबाबतच्या चर्चेला दुजोरा दिला होता. त्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देखील सामंतांच्या या वक्तव्याला पाठिंबा देत शिंदे गटाकडून उमेदवार हे किरण सामंत असतील असं म्हटलं. त्यामुळे शिंदे गटाकडून जरी उमेदवार निश्चित झाला तरी महायुतीच्या जागावाटपामध्ये ही जागा कोणाला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.