CM Eknath Shinde : आज सारथीचा लोकार्पण शुभारंभ झालेला असून राज्यातल्या मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी सारथी गेल्या चार-पाच वर्षापासून काम करते आहे. एक चांगली वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे आणि फक्त शासकीय वास्तू न राहता या वास्तू मधून तरुणांना, विद्यार्थ्यांना जे करिअर उभारायचं आहे, जे काही भवितव्य घडवण्याचं काम सारथी च्या माध्यमातून करणार आहोत 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते नाशिक (Nashik) शहरातील सारथी कार्यालयाचे (Sarthi) उदघाटन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. ते यावेळी म्हणाले. संस्थेचे बोधचिन्ह आहे ते छत्रपती शाहू महाराजांचा राजमुकुट आहे, हा मुकुट देशाचा नसून हुकूमशाचा नसून समाजातल्या दिन दुर्बलांसाठी वंचितांसाठी शोषितांसाठी त्यांच्या कल्याणासाठी लढा देणार आहे. सारथीच्या माध्यमातून तरुणांची उन्नतीसाठी जे काही लागेल, ते सरकार पुरविण्याचे काम करेल.यासाठी सरकार कुठेही हात आखडता घेणार नाही, सारथीला सक्षम करणं होस्टेलचा प्रश्न आहे, तो सोडवून हे आपण करणारच आहोत. सारथीचे कार्यालय हे नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी काम करणार असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना, तरुणांना न्याय देण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम सारथीच्या हातामध्ये आहे, सरकार तुमच्या सोबत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 


त्याचबरोबर सारथीसाठी छत्रपतींनी आमरण उपोषण केलं होतं. छत्रपती म्हणाले, मुंबई मध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं. या महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी किंबहुना इतरही जे काही या राज्यामध्ये समाज आहेत. त्यांच्या उन्नतीसाठी ते आग्रही असतात. प्रसंगी रस्त्यावर देखील उतरतात. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपतींची मागणी होती, कि सुपर न्यूमररी अधिसंख्य पद निर्माण करा. त्यानुसार आपले सरकार आल्यानंतर पहिला निर्णय अधिसंख्य पदासंदर्भात केला. सुरवातीला कायदा करून त्यानुसार शासनाचा जीआर निघाल्यानंतर काही ठिकाणी नियुक्त्या दिल्या, काही ठिकाणी नियुक्त्या देण्याचे काम सुरु आहे. 


दीड एकर मध्ये होस्टेल दीड एकरामध्ये चांगली मोठी इमारत उभी केली आहे. इथल्या समाजातील मराठा कुणबी तरुणांना नक्की त्याचा फायदा होईल. तसेच मंजूर जागेवर अभ्यासिका असून 500 मुलींचे, 500 मुलांचे वस्तीगृह उभारण्यात येणार असून आणखी काय उभारता येईल जेणेकरून आपल्याला या तरुणांना, विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, हे सरकारला सांगा, सरकार आपल्या पाठीशी आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, राज्यातल्या जनतेसाठी जे जे काही करायचं आहे, ते नक्की करा, केंद्र सरकार आपल्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून ज्या योजना आम्ही केंद्राकडे पाठवतोय त्या मंजूर होत आहे आणि याचा लाभ या महाराष्ट्रातल्या जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. 


नाशिक शहरात विविध कार्यक्रम


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान सारथीच्या उदघाटनानंतर आता पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ तसेच नाशिक येथील गंजमाळ येथील बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयाचे उदघाटन तसेच कालिदास कालामंदिर येथे एका स्थानिक वृत्तवहिनीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे आदी सहभागी होणार आहेत.