मुंबई : राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना (Balasaheb Thackeray Apala Davakhana) सुरू करण्याचे तसेच 10 टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच दिव्यांगांना बसस्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज एसटी महामंडळाला (MSRTC) दिले. प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळात नवीन वर्षात 3 हजार 495 एसटी बसेस सेवेत दाखल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. बसस्थानकांच्या स्वच्छतेला प्राधान्य देतानाच त्यांचा चेहरामोहरा बदलावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची 303वी संचालक मंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिले. एसटी महामंडळाला 20 नोव्हेंबरला एका दिवशी 37.63 कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. राज्यातील सामान्य नागरिकांना एसटीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी तयार 2200 साध्या बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. यामुळे 2200 तयार परिवर्तन साध्या बसेस मार्च 2024 अखेर एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. याबरोबरच एसटीच्या 21 वेगवेगळ्या विभागांसाठी 1295साध्या बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी देखील याबैठकीत मान्यता देण्यात आली.
महिला बचतगट, माजी सैनिक विधवा पत्नींसाठी स्टॉल
राज्यातील एकूण बसस्थानकांपैकी 10 टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना दुध, दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे स्टॉल देण्याच्या निर्णयाला तातडीने मंजुरी देतानाच मुख्यमंत्र्यांनी महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक बसस्थानकावर एक स्टॉल देण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याशी चर्चा करून योजना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
जिल्हा बसस्थानकावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
राज्य शासनाच्या माध्यमातून सामान्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणच्या बसस्थानकांवर आपला दवाखाना सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. एसटीतर्फे येत्या दोन वर्षांत 5150 ई-बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. जिल्हा आणि तालुकास्तरावर त्यांची सेवा देण्यात येणार आहे. या बससेवकरीता सामान्यांना परवडेल असेच तिकीट दर ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.