Eknath Shinde Devendra fadnavis Government : चित्रपटसृष्टीसह मनोरंजन क्षेत्रामधील निर्माते व कलाकारांच्या मनमानीला आता एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकार लगाम लावणार आहे. कारण चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकार आणि कामगारांसहित निर्माते व दिग्दर्शक यांसाठी एक नवीन नियमावली सरकारने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच नवीन नियमावली सरकारकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


बॉलीवूड क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळत नाही, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णायानंतर यापुढे कलाकार व कामगारांचे वेतन कायद्यानुसार द्यावे लागणार आहे.  ते न देणाऱ्या निर्माते व कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारकडून दिले जाणार आहेत. याउलट नव्या नियमावलीत कलाकार व कामगारांनाही अचानक काम बंद करून निर्माते व दिग्दर्शकांना वेठीस धरता येणार नाही. सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे कलाकार व कामगारांना कोणतीही समस्या असल्यास तक्रार करण्यासाठी एक नवे पोर्टल तयार करण्यात येणार आहे.  या पोर्टलवर चित्रपट सृष्टीत उपलब्ध असलेल्या कामाची माहिती ही कलाकार व कामगारांना मिळणार आहे.


चित्रपट निर्मात्यांवर कामगार व कलाकारांची जबाबदारी असणार आहे. चित्रपट सिरीअल, जाहिराती आणि वेब सिरीज यांना एसओपी लागू करण्यात येणार आहे. कामगार व कलाकारांचे शोषण थांबवण्यासाठी एसओपी लागू करण्यात येणार आहे. किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्याचे बंधनकारक असेल. आपले सरकार पोर्टलसह तक्रार करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येईल. महिला कामगारांना घरपोच वाहतूक व्यवस्था पुरवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात येणार आहे.  लवकरच याविषयी अधिकृत माहिती सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे. 


मायानगरी मुंबईतील प्रसिद्ध फिल्म इंडस्ट्रीमुळे मुंबईला फार महत्त्व आहे. या  इंडस्ट्रीमध्ये अनेक कर्मचारी आणि कामगार काम करतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना काही समस्या आहेत. यामध्ये समान काम समान वेतन, त्यांना असलेल्या समस्या ते मांडू शकत नव्हते तसेच महिलांना देखील काम करत असताना काही सुरक्षा चित्रपट निर्माते पूर्वत नव्हते. त्यामुळे वारंवार शिंदे फडणवीस सरकारकडे बॉलीवूड मध्ये नियम करून ते नियंत्रणात आणायला हवी अशी मागणी अनेक चित्रपट कलाकार, कर्मचारी आणि निर्मात्यांकडून होत होती. यामध्ये सांस्कृतिक विभागाने याची दखल घेत, गेल्या काही महिन्यांपासून याबाबत सर्वांशी बोलून नियमावली तयार केली आहे. आणि त्यानुसार आता बॉलीवूडमध्ये कामकाज करण्याच्या सूचना सरकारच्या वतीने देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.