Ambadas Danve On CM Eknath Shinde-Devendra Fadnavis : राज्यातील गुन्हेगारीवरून पुन्हा एकदा विरोधकांकडून सरकार टीका होतांना पाहायला मिळत आहे. तर, राज्यातील वाढते गुन्हे पाहता नागपूर शहरात 332.91 टक्के तर, ठाणे जिल्ह्यात 184.33 टक्के इतके गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ठाणे, नागपूर जिल्हयात गुन्हेगारीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई ठाण्यात पहाटेपर्यंत डान्सबार सुरू असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे टीकास्त्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर केले.
 
 तर, कायद्या सुव्यवस्था राखण्यास सरकारला आलेले अपयश, राज्याची ढासळलेली आर्थिक स्थिती, विस्कळीत झालेलं जनजीवन आदी मुद्द्यांवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर धारेवर धरले. आताच सरकार हे मूठभर सत्ताधाऱ्यांचे हित राखण्यात व्यस्त आहे असा आरोप दानवे यांनी अंतिम आठवड्यावरील प्रस्तावावर भाषण करताना केला. राज्यात कायद्याचा धाक राहिला नसल्यामुळे दंगलीच्या घटना, दिवसा मुलींवर होत असलेले हल्ले, अत्याचाराच्या घटना यात वाढ झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेतील अभियंतावर हात उगारणाऱ्या सत्ताधारी आमदार यांच्यावर सरकार कारवाई करत नाही. मात्र विरोधी पक्षाच्या आमदारावर कारवाईचा बडगा उचलतो. एकप्रकारे सरकार दुटप्पी भूमिका बजावत असल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला.


इंग्रजांच्या काळातही झालं नाही अशाप्रकारे या सरकारच्या काळात वारकऱ्यांवर लाठीमार झाला. राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या दंगलीच्या घटना या एकप्रकारे कोणी तरी षड्यंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी करत सरकारच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. महिला लोकप्रतिनिधींवर अश्लील टीका करणे, महापुरुषांचा अवमान करणे अशा कृतीतून काहीजण स्वतःची प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा फॅड फोफावल असल्याची टीकाही दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.


केंद्राकडून राज्यावर होतेय सापत्न वागणूक


राष्ट्रीय विकासदरात राज्याचे योगदान हे 14 टक्के असताना केवळ राज्याला 7 टक्के निधी देण्यात आला. याउलट उत्तर प्रदेश राज्याचे योगदान हे 7 टक्के असताना केंद्राकडून त्या राज्याला 18 टक्के निधी देण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला 64 हजार कोटी तर उत्तर प्रदेश राज्याला 1 लाख 83  हजार 7  कोटी आले. अशाप्रकारे 15 व्या वित्त आयोगात राज्यावर केंद्राकडून अन्याय व सापत्न वागणूक दिली गेल्याचा आरोप दानवे यांनी केला. केंद्राकडून जितका कर महाराष्ट्र राज्यातून केंद्राला दिला जातो, तितका वाटाही केंद्राकडून दिला जात नाही, एकप्रकारे महाराष्ट्र राज्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न केंद्राकडून होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


पोलीस आयुक्तालयाच्या संरक्षणात चालतात भाजप कार्यकर्त्यांचे अवैध धंदे; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप