BMC Election : मुंबई महानगर पालिकेची निवडणूक (BMC Election) कधी होणार असा प्रश्न सर्वांनाचं पडला आहे. या निवडणुकीबाबत राजकीय नेते वेगवेगळी वक्तव्य करत आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या मुद्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जानेवारी महिन्यात मुंबई महानगर पालिकेसाठी निवडणूक होणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तर मुंबई पालिकेची निवडणूक कधी होणार हे फक्त देव आणि न्यायालय यांनांच माहित असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
लोकशाहीत प्रशासक इतके दिवस राहणं योग्य नाही
वर्षा या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पालिकेच्या निवणुका जानेवारी महिन्यात होणार असल्याचं सांगितलं आहे. बीएमसी निवडणुकांना विलंब होत आहे. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रश्न विचारला होता. यावेळी ते म्हणाले की, मी सांगू शकत नाहीत कारण ते फक्त निवडणूक आयोग आणि न्यायालये ठरवतील असे फडणवीस म्हणाले. मुंबई पालिकेवर अनिश्चित काळासाठी प्रशासक राहणं योग्य आहे का? असा सवाल देखील फडणवीसांना विचारण्यात आला, यावेळी लोकशाहीत प्रशासक इतके दिवस राहणं चांगले नसल्याचे फडणवीस म्हणाले. सुप्रीम कोर्टाने स्थस्थिती दिली आहे. या निवडणुका घेण्यात राज्याची भूमिका नाही. निवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाचा आहे, जो स्वतंत्र आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर नोव्हेंबरमध्ये सुनावणी सुरु होणार आहे. निवडणूक आयोगानं शिवसेनेचे नाव आणि चिन्ह निश्चित केल्यावर निवडणुका जाहीर होतील का? असा प्रश्न देखील फडणवीसांना विचारण्यात आला, याबाबत काहीही सांगणं कठीण असल्याचे फडणवीस म्हणाले.
बीएमसी कार्यकाळ या वर्षी मार्चमध्ये संपला आहे. त्यानंतर निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर महापालिका आयुक्तांची सहा महिन्यांसाठी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. आता सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी देखील अजूनही निवडणुका झालेल्या नाहीत.
मुंबईकरांना दोन महत्त्वाच्या गोष्टी देणार
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांना दोन महत्त्वाच्या गोष्टी देण्याची इच्छा व्यक्त केली. यामध्ये पहिली गोष्ट खड्डेमुक्त रस्ते आणि दुसरी मुंबई एक सुंदर शहर. वर्क ऑर्डर मिळताच मुंबईतील पाच हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं भूमिपूजन होणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी सर्वप्रथम पालिका आयुक्त इक्बाल चहल यांना फोन केला आणि त्यांना सतत खड्डे का पडतात असे विचारल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मला खड्डे नको आहेत आणि सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी आराखडा तयार करण्यास मी त्यांना सांगितल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पुढील दोन वर्षात, रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पामुळं मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न सोडवला जाईल. जो शहराच्या सुशोभीकरण प्रकल्पाला हातभार लावेल.
सत्तांतर झालं आणि निवडणुका लांबणीवर पडल्या
मे महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची सूचना केली होती. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घ्या, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. परंतु त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकारने वॉर्ड रचना पुन्हा नव्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या. महाविकास आघाडी सरकारने मुंबई महानगरपालिकेमध्ये एक सदस्यीय प्रभाग आणि इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यांचा प्रभाग केला होता. त्यानंतर शिंदे सरकारने 2017 प्रमाणे चारचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला महाविकास आघाडीने जोरदार विरोध केला होता.
महत्त्वाच्या बातम्या: