अहमदनगर : राज्य सरकारने नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याच्या निर्णयानंतर सरपंच जनतेतून निवडण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला. या निर्णयाने गावं स्वावलंबी होण्यास मदत होईल, असं म्हणत सरकारच्या या निर्णयाचं राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी स्वागत केलं आहे.


जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय योग्य आहे. गावं स्वावलंबी करण्यासाठी महत्त्वाचा हा निर्णय महत्वाचा आहे. सरपंच थेट जनतेतून निवडलेला असल्यामुळे ग्रामपंचायतीतील अस्थिरता थांबेल. काम करणाऱ्यांना संधी आहे. शिक्षणाच्या अटीने गावाच्या विकासाला चालना मिळेल, असं मत पोपटराव पवारांनी व्यक्त केलं.

सरपंचांना देण्यात आलेल्या अधिकाराचीही योग्य पद्धतीने अंमलबजावणी होण्याची गरज असल्याचं पोपटराव पवारांनी सांगितलं. सरपंचांना अधिकार मिळाले, मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होण्याची गरज आहे. सध्या ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे योजना गावात पोहचणार आहे, असं पोपटराव पवार यांनी सांगितलं.

पोपटराव पवार काय म्हणाले?

  • सरपंच विरोधी गटाचा निवडून आल्यास सरपंचाला ग्रामसभेत जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे विकास कामांवर परिणाम होणार नाही.

  • सरपंचपदाच्या निवडणुकीत घोडेबाजराला लगाम बसेल. होतकरु तरुणांना संधी मिळेल.

  • पंचायतराज व्यवस्थेचं महत्व कमी होणार नाही. झेडपी आणि पंचायत समिती बळकट करण्यासाठी अभ्यासगट तयार केलाय, त्याचा अहवालही सरकारला सादर केला आहे.

  • अनेक ग्रामपंचायतींना भ्रष्टाचाराची किड लागली आहे. त्यामुळे दरवर्षी त्यांचं ऑडिट करण्यात येणार आहे. सहा महिन्यांत त्रुटी दूर करुन कारवाई करणार.

  • भावी सरपंचाची जबाबदारी वाढली आहे. सरकारी मदतीने जलयुक्त शिवारसह अनेक योजनांची यशस्वी योजना राबवावी. कामं केली नाही तर गावं कार्पोरेट कंपन्यांच्या हातात जातील.

  • सरकारचा हा राजकीय निर्णय नाही. कारण यातून गावं स्वावलंबी होण्यास मदत होईल.