मुंबई: पंतप्रधान नरेंद मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या धर्तीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमामधून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.
येत्या रविवारपासून हा कार्यक्रम डीडी सह्याद्रीसह मराठी वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात येणार आहे. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाचा पायलट एपिसोड नुकताच शूट करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांकडून व्हॅट्स अॅप आणि ईमेलच्या माध्यमातून प्रश्न मागवण्यात आले होते.
राज्यातल्या 30 शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी होता आलं आणि थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारता आले. मोदींच्या रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यापुढचं पाऊल टाकत थेट शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत राज्यभरात अनेक आंदोलनं सुरु आहेत. याच मुद्द्यावरुन विरोधक आणि शिवसेना भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्नही करत आहेत. दुसरीकडे विरोधकांनी संघर्ष यात्रा काढून सरकारला टार्गेट करण्याचा जोरदार प्रयत्न सुरु केला आहे. यामुळे राज्यात सरकारविरोधी वातावरण तयार होऊ नये यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या:
तीन दिवसात कर्जमाफीबाबत निर्णय घ्या, अन्यथा... : अजित पवार
...तर शेतकरीच फडणवीस सरकारला इंगा दाखवेल : शरद पवार
यूपीत कर्जमाफी, महाराष्ट्रात कधी? मुनगंटीवार आणि शेट्टींची प्रतिक्रिया
ज्योतिबा फुले जयंतीपासून आसूड यात्रा, आ. बच्चू कडू रस्त्यावर उतरणार!