मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या 3 महिन्यात 18 किलो वजन कमी केलं आहे. फडणवीस यांचं वजन 122 किलो होतं. मात्र योग्य आहार, पथ्य आणि आवश्यक औषधांच्या मदतीने त्यांनी 3 महिन्यात 18 किलो वजन कमी केलं आहे.


उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने 18 महिन्यात तब्बल 108 किलो वजन कमी केल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आता मुख्यमंत्र्यांनीही तीन महिन्यात 18 किलो वजन कमी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस वजन घटवण्यासाठी मेटाबॉलिकचा उपचार घेत आहेत. यामध्ये औषधांसोबतच त्यांच्या शरीराला योग्य आहार आणि पथ्य पाळावी लागत आहेत.
डिसेंबरमध्ये डॉक्टरांशी संपर्क

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर महिन्यात डॉक्टरांशी संपर्क साधला होता आणि फेब्रुवारीमध्ये उपचाराला सुरुवात केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच वजन 122  किलो होतं. मात्र फक्त तीन महिन्यात मुख्यमंत्र्यांनी 18  किलो वजन कमी करुन आता 104 किलोवर आणलं आहे. वजन 88 - 90 किलोपर्यंत कमी करण्याचं मुख्यमंत्र्यांच लक्ष्य आहे. फडणवीस यांनी अशीच मेहनत घेतली तर येत्या 3 महिन्यात ते लक्ष्य पूर्ण करतील, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.


पत्नीकडून वजन कमी करण्याची प्रेरणा

मुख्यमंत्र्यांना वजन कमी करण्याची प्रेरणा पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून मिळाली. याबाबत सांगताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, "देवेंद्र यांनी याआधीही वजन कमी केलं होतं. पण कामाचा व्याप आणि अनियमित वेळापत्रकामुळे त्यांचं वजन पुन्हा वाढलं होतं. जेव्हा मी माझं वजन 5 ते 6 किलो कमी केलं तेव्हा त्यांनाही प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनीही वजन कमी करण्याचं मनावर घेतल."

नियमित 10 हजार पावलं चालणं

"मुख्यमंत्री असल्याने देवेंद्र फडणवीस यांना खूप प्रवास करावा लागतो. यामुळे त्यांच्या वेळापत्रकात सातत्याने बदल होतो. मात्र तरीही त्यांच्या हालचाली चांगल्या आहेत. दिवसाला 10 हजारापेक्षा जास्त पावलं चालण्याची त्यांना गरज होती. पण  10 हजार पावलं चालण्यासोबतच ते वेगानेही चालतात," अशी माहिती मुख्यमंत्र्यांवर उपचार करणाऱ्या डॉ. जयश्री तोडकर यांनी दिली आहे.


शारीरिक व्यायाम

शारीरिक व्यायमासाठी मुख्यमंत्र्यांनी मिकी मेहता यांची मदत घेतली आहे. मुख्यमंत्र्यांना आठवड्यातून दोन तास श्वासोच्छवासाचा व्यायाम शिकवला जातो. "फडणवीस यांना दिवसातून जेमतेम चार ते पाच तासांची झोप मिळते. श्वासोच्छवासाच्या व्यायामाने अपुऱ्या झोपेचा शीण भरुन काढला निघतो. वर्षअखेरीस मुख्यमंत्री त्यांचं लक्ष्य पार करतील," असं मिकी मेहता यांनी सांगितलं.

 

मुख्यमंत्र्यांचा डाएट प्लॅन

डॉ. तोडकर यांच्या माहितीनुसार, "मुख्यमंत्री त्यांच्या डाएटचं काटेकोरपणे पालन करतात. ते दिवसातून एकदाच चहा पितात. त्यांच्या शाकाहारी जेवणात पनीर तर मांसाहारी जेवणात मासे, चिकनचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांना डाएट चार्टप्रमाणेच बटर आणि तूप खाण्याची परवानगी आहे. मात्र बाहेरचं जेवण आणि जंक फूड खाण्यावर बंदी आहे.