मुंबई: 'मला मुख्यमंत्रीच राहू द्या, ज्यांनी पंतप्रधानपदाचं स्वप्नं पाहिलं ते कधीही पंतप्रधान बनू शकले नाही.' असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोमणा लगावला. मुंबईतील पवई आयआयटीमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.


पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांच्या अनेक रोखठोक प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी खुमासदारपणे उत्तरं दिली.

'तुमचं पुढचं ध्येय काय? तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे का?' या  प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनीही तेवढ्याच खुमासदारपणे उत्तर दिलं.

याचवेळी मुख्यमंत्र्यांना उपस्थित विद्यार्थ्यांनीही प्रश्न विचारले. त्यातील एका विद्यार्थ्यांने मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की, 'एकदा नोकरी मिळाली आपण निवांत होतो, एक प्रकारचा आत्मसंतुष्टपणा येतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमच्याबाबत नेमकं काय झालं?'

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'गेली दोन वर्ष झाली मी नीट झोपू शकलेलो नाही. माझ्या डोळ्याखाली काळी वर्तुळं त्यामुळेच झाली आहेत. खूप काम करायचं आहे. मोठ्या पदावर बसलं की, आत्मसंतुष्टपणा येत नाही. माझ्याबाबत तरी अजून तसं काही झालेलं नाही.

दरम्यान, याचवेळी मुख्यमंत्री आरक्षणाबाबतही भाष्य केलं. 'खरं तर आरक्षणाची गरज आहे. जे शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास राहिले आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण सध्या परिस्थिती बदलत आहे.'

याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना सध्या गाजत असणाऱ्या नोटाबंदीवरही प्रश्न विचारण्यात आला. नोटाबंदी भ्रष्टाचाराला खरं उत्तर आहे का? असा सवाल फडणवीस यांना विचारण्यात आला.

'नोटबंदी हे भ्रष्टाचाराविरोधात एक पाऊल आहे. हा निर्णय यशस्वी झाला आहे. काही लोकांनी दुरुपयोग केला पण 31 डिसेंबरनंतर त्या लोकांवर कारवाई होणार. त्यामुळे अशा लोकांना सोडणार नाही.' असं मुख्यमंत्री म्हणाले.