लातूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत.


निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. शिवाजी विद्यालय शाळेच्या मैदानातून उड्डाणानंतर 50 फुटांवर असताना, एका मिनिटाच्या आतच हेलिकॉप्टर कोसळलं. चॉपर फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

यानंतर सगळीकडे धुरळा उडाला आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. दुर्घटनेनंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.

हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण?



यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, केतन पाठक, प्रधान सचिव प्रवीण परदेशी आणि दोन क्रू मेंबर हेलिकॉप्टरमध्ये होते. हे सर्व जण सुखरुप आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री सध्या लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरी आहेत.

सगळ्यांच्या आशीर्वादाने सुखरुप : मुख्यमंत्री

"मी सध्या निलंग्यातच आहे, छोटासा अपघात झाला आहे.


आम्हाला कोणाला काहीच झालेलं नाही. मला तर काहीच इजा झालेली नाही.


डॉक्टरांनी तपासणी केली आहे. सुगर, ब्लड प्रेशर सगळं व्यवस्थित आहे.


ईश्वराची कृपा आणि महाराष्ट्रातील 11 कोटी 20 लाख लोकांचा आशीर्वाद


माझ्या पाठीशी असल्याने मी सुखरुप आहे.


काळजी करण्याचं कारण नाही,"


अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर एबीपी माझाशी बोलताना दिली.


राज्यातील जनतेला मुख्यमंत्र्यांचा संदेश


दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचं ट्वीट

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/867631821156233216

देवेंद्रजी रिलॅक्स होते. जेमतेम मिनिटभर  बोलणं : अमृता फडणवीस

मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, सर्वजण सुखरुप आहेत.


बोलणं झालं तेव्हा देवेंद्रजी रिलॅक्स होते. जेमतेम मिनिटभर संभाषण झालं.


देवेंद्रजी तूर्तास संभाजी निलंगेकरांकडे थांबले आहेत, तिथून दौरा पुढे करतील,


अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली.


 

दरम्यान, लातूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रमदान करुन तरुणांसोबत संवाद साधला. शिवाय जलयुक्त आणि शेततळ्यांची पाहणीही केली.
लातूर दौऱ्यावर असेलेल्या मुख्यमंत्र्यांनी हलगरा हे गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया



नागरी हवाई उड्डाण संचालनालयची माहिती
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरने दुपारी 12 वाजता उड्डाण केलं. पण वाऱ्याचा बदलता दाब लक्षात आल्याने वैमानिकाने लॅण्डिंग करण्याचं ठरवलं. पण यादरम्यान, हेलिकॉप्टरचा पंखा वीजेच्या खांबांच्या तारांमध्ये अडकलं. यामुळे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. चॉपरमधील सर्व सहा जण सुखरुप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, अशी माहिती नागरी हवाई उड्डाण संचालनालयाने दिली.

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्याना फोन

हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन विचारपूस केली.