मुंबई : कुणाला मंत्री करायचं याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशातून विचार करुनच आले आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार निश्चितपणे होईल, असं म्हणत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे स्पष्ट संकेत दिले आहेत.


काही महामंडळाच्या घोषणा झाल्या आहेत. उर्वरित महामंडळाच्या घोषणा लवकरच होतील. भाजपची कोअर कमिटी आणि मित्रपक्षांशी चर्चा करून विस्तार योग्य वेळी करण्यात येईल, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं बोललं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे कुणाला नवी जबाबदारी मिळणार आणि कुणाला डच्चू दिला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महामंडळ नियुक्त्या जाहीर

राज्य शासनाने विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार चैनसुख संचेती यांची, तर ऊर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांची नियुक्ती केली आहे.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दोन मंडळाचे अध्यक्ष आणि दोन महामंडळाच्या उपाध्यक्षपदांच्या नियुक्तीला मान्यता दिली होती.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी आमदार डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांची, तर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खासदार संजय काका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असलेल्या डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.