मुंबई : फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरं जाण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच महापालिका निवडणुकांची मोठी परीक्षा पार केली आहे. अनेक महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकला, तर मुंबईतही भाजपने 82 जागा मिळवत घवघवीत यश मिळवलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांनाही ताणतणाव विसरुन परीक्षांना सामोरं जाण्याचं आवाहन केलं आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या कारकीर्दीची दिशा ठरवणाऱ्या असल्या, तरी त्या निर्णायकी नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचा अवास्तव ताण न घेता मुक्त मनाने आणि आत्मविश्वासाने या परीक्षांना सामोरं जावं, असं मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात.

या टप्प्यानंतर केवळ पारंपरिक अभ्यासक्रमांच्या मागे न धावता कौशल्य विकासासासाठी उपयुक्त असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचा मार्गही आता विद्यार्थ्यांसाठी चांगला पर्याय ठरु शकतो, असं फडणवीसांनी सुचवलं आहे. केंद्र आणि राज्य शासन त्यासाठी विविध उपक्रम राबवत असून त्याचाही विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.