मुंबई : विरोधकांचं नाक दाबण्याच्या अनेक कुंडल्या आमच्या हातात आहेत, योग्य अस्त्र योग्य वेळी ते बाहेर काढू, असा गर्भित इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.


मुंबईत भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. त्यामध्ये कार्यकर्त्यांसमोर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं. 'विरोधकांचं नाक दाबण्याच्या अनेक कुंडल्या आमच्या हातात आहेत, आम्ही अस्त्रं सांभाळून ठेवली आहेत. योग्य वेळी ते बाहेर काढू' असं फडणवीस म्हणाले.

'तुम्ही विरोधकांची काळजी करू नका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला न डगमगता सामोरे जा, आक्रमक राहा, आपण केलेलं काम जनतेसमोर मांडा' असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण, वाढती गुन्हेगारी या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलेला हा इशारा महत्वपूर्ण ठरत आहे.