औरंगाबाद : औरंगाबादमध्ये झालेल्या शिक्षकी राड्याच्या पार्श्वभूमीवर उद्या राज्यभरातील शाळा-कॉलेजेस बंद ठेवण्यात येणार आहेत. मुख्याध्यापक संघाने घटनेचा निषेध म्हणून बंदचा एल्गार दिला आहे.

विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी औरंगाबादेत शिक्षकांनी मोर्चा काढला. तब्बल 8 वर्षांनी राज्य मंत्रिमंडळाची मराठवाड्यात बैठक होती. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी शिक्षकांनी मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढला. शिक्षकांचा मोर्चा आक्रमक होत असताना, पोलिसांनी खबरदारीसाठी मोर्चाला अडवलं होतं. पण त्यानंतर हुल्लडबाजांनी दगडफेक केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

शिक्षकांची शिवीगाळ : तावडे

मोर्चा पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याला उत्तर म्हणून संतप्त शिक्षकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये काही पोलिस आणि शिक्षकही जखमी झाले आहेत. शिक्षकांनी आंदोलनावेळी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि घोषणाबाजी केल्याचा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.

250 जणांवर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे

शिक्षकांच्या राड्याप्रकरणी तब्बल 250 जणांवर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

या घटनेत काही पोलीस जखमी झाले आहेत. शिवाय सरकारी मालमत्तेचं नुकसान झालं आणि त्यामुळे परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. सर्व आरोपींवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

धक्कादायक म्हणजे यावेळी धावपळीदरम्यान एका पोलिसाचा मृत्यू झाला. मात्र पोलिस राहुल कांबळे यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

राज्यातील सर्व शाळांमध्ये काळ्या फिती लावून काम


उद्या मुंबईसह राज्यातील सर्व शाळांमध्ये काळ्या फिती लावून शिक्षक काम करणार असल्याचे शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी जाहीर केले आहे. तसेच राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या बंदलाही महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क कृती समिती आणि शिक्षक भारतीने पाठिंबा जाहीर केला आहे.

औरंगाबादेत तब्बल 8 वर्षांनी आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी विनाअनुदानित शिक्षकांनी हा मोर्चा काढला होता.

संबंधित बातम्या :


औरंगाबादमधील शिक्षक मोर्चा, 250 शिक्षकांवर गुन्हे दाखल, 57 जण ताब्यात


शिक्षक-पोलिसांची धुमश्चक्री, मुख्यमंत्री पार्टी झोडण्यात दंग


औरंगाबादेत शिक्षकांच्या मोर्चावर लाठीचार्ज, गोंधळात पोलिसाचा मृत्यू