पनवेल : नगरपालिका, जिल्हा परिषदा, महानगरपालिकांमध्ये भाजप बहुमताने जिंकली आहे. त्यामुळे परिवर्तन करणारी भाजप आहे. पनवेलकरांनीही महापालिका हाती द्यावी, आम्ही विकास देऊ, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेलकरांना केले.


पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी पनवेलकरांवर घोषणांचा पाऊस पाडला.

“पनवेल महापालिका होऊ नये म्हणून विरोधकांनी अनेक प्रयत्न केले. कोर्टात केसही दाखल केल्या. मात्र, भाजप सरकारने पनवेल शहराचा विकास करण्यासाठी महापालिका स्थापन केली.”, असे मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून पनवेलकरांवर घोषणांचा पाऊस :

  • 200 कोटी रुपयांची पाण्याची योजना पनवेल मनपासाठी मंजूर केली आहे.

  • अटल अमृत योजनेतून 200 कोटी मंजूर केले.

  • राज्य सरकारच्या वतीने घणकचरा व्यवस्थापन केले. कचऱ्यापासून कोळसा तयार केला जात आहे. खत, विद्युत निर्मिती केली जात आहे.

  • नवी मुंबईतील सिडकोच्या हातात असलेली जमिनी फ्री-होल्ड करण्यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे.

  • 2018 पर्यंत पनवेल खारघर मधील मेट्रो लाईन सुरु करणार

  • 106 किलोमीटर मेट्रो नेटवर्क पूर्ण करणार, नवी मुंबई आणि पनवेल मेट्रोने जोडणार

  • पनवेलला स्मार्ट सिटी करण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून सर्व सुविधा पुरवली जाईल.