मुंबई : पूरग्रस्तांना मदत करताना केलेल्या सेल्फी प्रदर्शनानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर भाजपचा आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह स्वतःचा फोटो असलेले स्टिकर मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याच्या पाकिटावर लावले आहेत. पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मुदतीमध्ये देखील भाजप सरकार चमकोगिरी करत जाहिरातबाजी करत असल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.



मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा  प्रकार   
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे. मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे, असे म्हटले आहे. सरकारच्या पैशांवर अशा प्रकारे जाहिरातबाजी करणे योग्य नाही. जनता ह्या लोकांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे. तर सरकार प्रसिद्धीसाठी वाटेल ते पाऊल उचलत आहे. हे चमकोगिरी करत आहेत. कार्यकर्त्यांना छुप्या पद्धतीने हे स्टिकर लावायला सांगितले असतील, असा आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.

फोटो हटवणार, सुरेश हाळवणकर यांची दिलगिरी
पूर परिस्थिती ओसरल्यानंतर मदतीसंदर्भात शासन निर्णय आल्यानंतर तातडीने बैठक घेऊन आम्ही धान्याची मदतीसाठी आम्ही पैकेट्स तयार केलरर. रेशन दुकानदारांनी हे फोटो लावले. ही मदत शासनाची आहे. रेशन दुकानदारांच्या कमिटीला मी बोललो आहे. महाराष्ट्र शासन लिहिणे अपेक्षित आहे. मात्र रेशन दुकानदारानी हे फोटो लावले. आता ते स्टिकर काढण्याबाबत सांगितले जाईल, असे स्पष्टीकरण आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिले आहे. तसेच त्यांनी या प्रकारावर दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.

सरकारची प्राथमिकता कशाला? तर स्टिकर छापायला. स्टिकर छापण्यासाठी पूरग्रस्तांना तब्बल 2  दिवस मदत दिली नाही. लेकरं-बाळं उघड्यावर पडलीत. यांना मात्र स्वत:चे फोटो टाकत स्टिकर डिझाईन करून, प्रिंट करून ते चिटकवण्यात तत्परता दाखवायची आहे. शोबाजीसाठी लोकांना उपाशी माराल, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.


दुसरीकडे सांगली, कोल्हापूरसह पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. सोशल माध्यमांतून वेगवेगळ्या संस्था, संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर मदतीसाठी आवाहन केले जात आहे. या माध्यमातून मोठा मदतनिधी देखील उभा होत आहे. काल बारामतीमध्ये शरद पवारांच्या आवाहनानंतर बारामतीतून एक कोटींची मदत आणि अन्य साहित्य जमा केले आहे तर सिद्धीविनायक ट्रस्टकडूनही मदत केली जाणार आहे. पूरग्रस्तांसाठी मुंबईतील गणपती मंडळं पुढे येणार आहेत. गणेश उत्सवात भरमसाठ खर्च न करता मंडळांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करण्याचं आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून सर्व मंडळांना करण्यात आले आहे.

महापुराचं थैमान कायम
सलग सहाव्या दिवशीही कोल्हापुरात महापुरानं घातलेलं थैमान कायम आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी पुराचं पाणी मात्र ओसरलेलं नाही. त्यामुळं कोल्हापूर, सांगली आणि कराडमधल्या नागरिकांना अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. दरम्यान सहाव्या दिवशीही हवाई दल, एनडीआरएफ यांच्याकडून बचावकार्य सुरु आहे. सांगलीमध्ये एनडीआरएफला लष्कराची मदत मिळाल्यानं रेस्क्यू ऑपरेशनला वेग आल्याचं बघायला मिळतंय. महापुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरमधून फूड पॅकेट्स दिले जातायत. यासाठी लष्कराच्या 2 हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येतोय. सांगलीतही कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात घट झाली आहे.