मुंबई : जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात उत्पादन शुल्क विभागातील जवळपास 220 अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्या आणि बढतीचे प्रकरण विधीमंडळात गाजत असतानाच, एकनाथ खडसे यांनी दिलेला महसूलमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पथ्यावर पडला असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी अनेक बदल्या केल्याचे गंभीर आरोप काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत केले.


 

राज्य उत्पादन शुल्क विभागातील रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालिन अधीक्षक विजय चिंचाळकर यांना जून 2013 मध्ये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विभागाने खटल्यास मान्यता दिल्यानंतर ऑगस्ट 2015 मध्ये नियमानुसार त्यांची चंद्रपूर जिल्ह्यात अकार्यकारी पदावर स्थापना करण्यात आली होती. शासन निर्णयानुसार त्यांना त्याच पदी ठेवणे आवश्यक असताना तसेच बदलीसाठी पात्र नसतानाही मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांची कोल्हापूर येथे कार्यकारी पदावर नेमणूक करण्यात आली.

 

उत्पादन शुल्क विभागातील आणखी एक पदाधिकारी मनोहर अंचुळे यांचीही घटना सारखीच असताना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रधान सचिव राजेशकुमार यांनी त्यांची धुळे येथे कार्यकारीपदी नेमणूक करण्यात आली.

 

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळी यांनी एका महिला डॉक्टरशी गैरवर्तणूक केली होती. या पीडित महिलेने याबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या महिला डॉक्टरने थेट नाव घेऊन तक्रार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तरीही माळीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही. मुख्यमंत्री शिवसेनेला घाबरतात का? असे गंभीर आरोप नितेश राणे यांनी विधानसभेत केले आहेत.