वसई: पालघर निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप जारी केल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत वसईत स्पष्टीकरण दिलं.


पराभव दिसतोय म्हणूनच शिवसेना या पातळीवर उतरली आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी शिवसेनेने माझी ऑडिओ क्लिप मोडून- तोडून सादर केली. ही संपूर्ण ऑडिओ क्लिप 14 मिनिटांची आहे. मी स्वत: ती क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते वसईत बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण क्लिप ऐकवली. तसंच शिवसेनेने त्यांना हवी तशी ऑडिओ क्लिप एडिट केल्याचा आरोप केला.

आदेश बांदेकरांवर टीकास्त्र

यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेने नेते आणि सिद्धीविनायक ट्रस्ट अध्यक्ष अभिनेते आदेश बांदेकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं.

आदेश बांदेकर यांनी पालघरच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलं आहे, ते वाचून दाखवलं होतं. त्यावरुन मुख्यमंत्री बांदेकरांवर हल्ला चढवला.

“ही ऑडिओ क्लिप मी पाहिली नाही. भावोजी की कोण ते...शिवसेनेचे नेते, काय नाव त्यांचं? बांदेकर...ती क्लिप बांदेकरांनी वाचून दाखवली. मी मनात म्हटलं, अरे मित्रा तू सिद्धिविनायकाचा अध्यक्ष आहेस. नाही जनाची, मनाची तरी ठेव. सिद्धिविनायकाचा अध्यक्ष आहे , किमान अध्यक्ष असेपर्यंत तरी खरं दाखव. पूर्ण दाखव. अर्धवट दाखवू नको. पण तो काय करणार, छोटासा माणूस आहे. आदेशाने काम करतो. आदेशच नाव आहे.”  असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ती क्लिप माझीच, मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण क्लिप जारी 

मुख्यमंत्र्यांनी जारी केलेली ऑडिओ क्लिप

एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता... आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे?
ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही
आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे
ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा...
साम, दाम, दंड, भेद...
ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही.
कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे.
'अरे ला कारे'च करायचं..
'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे

चिंता करु नका. आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी सक्षम आहोत. 

(शिवसेनेने इथवर दाखवली होती, त्यापुढची क्लिप मुख्यमंत्र्यांनी जारी केली)

आपण सरकार पक्ष आहोत. आपण कधी सत्तेचा दुरुपयोग करत नाहीत. 
परंतु आपल्या विरुद्ध जो कोणी दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करेल, तर त्याला सोडणारही नाही. ही मानसिकता या निवडणुकीत ठेवली पाहिजे.