मुंबई : चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी वन विभागातील ‘घोडाझरी’ या नवीन अभयारण्याच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत या अभयारण्याच्या निर्मितीस परवानगी देण्यात आली. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवरही उपस्थित होते.


ब्रम्हपुरी वन विभागातील एकूण 159.5832 चौ.कि.मी क्षेत्र घोडाझरी अभयारण्यात समाविष्ट होणार असून या क्षेत्रामध्ये वन विभागातील नागभीड, तळोधी व चिमूर वन परिक्षेत्रातील पहाडी जमीनीचे आणि घोडाझरी तलावालगतचे वनक्षेत्र आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/958721438269161472

या क्षेत्रामध्ये सात बहिणी पहाड, मुक्ताई देवस्थान- धबधबा असून प्रस्तावित अभयारण्याच्या पूर्व भागास नागपूर ते चंद्रपूर रोड आहे. या वनक्षेत्रात पहाडी भाग मोठ्याप्रमाणात असून वन्यजीवांच्या अधिवासासाठी हा भाग अतिशय उपयुक्त आहे.

या वनक्षेत्रात 10 ते 15 वाघ, 23 बिबटे यासह रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, कोल्हे, रानडुक्कर, माकड आणि ससे यासारखे वन्यजीव वास्तव्यास आहेत.  या अभयारण्याच्या निर्मितीमुळे आजुबाजूच्या 59 गावांमध्ये रोजगार निर्मिती होईल.