कोल्हापूर : कोल्हापुरातील मरळी गावात तिसरीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलांचं अपहरण झाल्याची घटना घडली आहे. जवळच्या नातेवाईकानेच मुलाचं अपहरण केल्याचा संशय आहे. प्रदीप सुतार असं अपहरण झालेल्या मुलाचं नाव आहे.


पन्हाळा तालुक्यातील मरळी इथे सरदार तुकाराम सुतार हे आपल्या कुटुंबींयासह राहतात. त्याचं गावातच वेल्डिंग शॉप आहे. प्रदीप हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे.

सरदार सुतार यांचा साळवन इथला नातेवाईक विश्वास लोहार हा नेहमी सरदार सुतार यांच्याकडे राहण्यासाठी येत होता. सोमवारी दुपारी प्रदीपला दुकानात घेऊन जातो अस सांगून तो त्याला घेऊन गेला. मात्र उशिरापर्यंत ते दोघेही परत आले नाहीत. संध्याकाळी सरदार सुतार आणि त्याच्या कुटुंबीयांनी प्रदीपचा गावात शोध सुरु केला, परंतु तो तापडला नाही.

काही लोकांना प्रदीपला रंकाळा बसस्थानक परिसरात पाहिल्याचं सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणात संशयित नातेवाईक आणि त्याचा मित्र अशा दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी विश्वास लोहारकडे चौकशी केल्यानंतर त्याने आपल्या अन्य एका मित्रासह प्रदीपला घेऊन रविवारी दिवसभर शहरात फिरल्याची कबुली दिली. मात्र त्याला कुठे सोडलं किवा त्याचा घातपात केला का? याबाबत दोघांनीही मौन बाळगलं.