अहमदनगर : कोकण कड्यावरुन बेपत्ता झालेले प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृतदेह सापडला आहा. हरिश्चंद्र गडावर रॅपलिंग करताना शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते बेपत्ता झाले होते. स्थानिकांच्या मदतीनं सावंत यांचा शोध घेण्यात आला. कड्याच्या दरीत पडून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, सावंत यांच्याबरोबर असलेल्या तीन जणांना बाहेर काढण्यात आलं आहे.

कोकण कड्यावरून रँपलींग करताना अरुण सावंत हे ग्रुप लिडर होते. शनिवारी सायंकाळपासून अरुण सावंत बेपत्ता झाले होते. अरुण सावंत आणि इतर गिर्यारोहकांची टीम असे एकुण 30 जण हरिश्चंद्र गडावर रँपलींगसाठी आले होते. हरिश्चंद्र गडाचा कोकण कडा ते माकड नाळ या हरिश्चंद्र गडावर गडाचाच एक भाग असलेल्या कड्यापर्यंत त्यांची टीम आधी वरुन खाली आणि त्यानंतर आडवं रँपलींग करणार होते. रँपलींगचा पहिला टप्पा जवळपास पुर्ण होत आला होता. अरुण सावंतांसोबत असलेले 29 जण पहिला टप्पा उतरून आले होते. सर्वात शेवटी अरुण सावंत दोरीचा सहाय्याने रँपलींग करत असताना सायंकाळी पाच वाजता नाहीसे झाले. तेव्हापासून अरुण सावंत यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नव्हता. स्थानिकांच्या मदतीने अरुण सावंत यांचा शोध घेण्यात आला.

स्थानिकांच्या मदतीने घेतला शोध -

कोकण कड्याची एकुण उंची अठराशे फुट असुन जिथून अरुण सावंत नाहीसे झालेत ती उंची जवळपास एक हजार फुटांची आहे. हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असलेल्या बेलपाडा गावातून अरुण सावंत यांचा शोध सुरू करण्यात आला होता. अरुण सावंतांसोबत असलेल्या 29 जणांना स्थानिक तरुणांनी दोरीच्या सहाय्याने वरती काढण्यात आलं आहे. अरुण सावंत हे ट्रेकींगच्या क्षेत्रातील मोठं नाव मानलं जातं. गेल्या तीस ते पस्तीस वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत अरुण सावंतांनी सह्याद्री मधील अनेक ठिकाणं आणि अनेक वाटा उजेडात आणल्या आहेत.


Peter Van Geit | एका अवलियाची महाराष्ट्र भ्रमंती | ABP Majha