उस्मानाबाद : 'लोकमंगल ग्रुप'च्या 91 लाखांच्या रोकड जप्ती प्रकरणी अनियमितता झाल्याचं स्पष्टीकरण काल खुद्द सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलं आणि या प्रकरणी प्रसंगी शिक्षा भोगायला तयार असल्याचंही देशमुख म्हणाले. मात्र दुसरीकडे सहकार सहाय्यक निबंधकांनीच देशमुखांना क्लीन चिट दिली आहे.


निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं बुधवारी जप्त केलेली 90 लाख 50 हजारांची रक्कम ही लोकमंगल मल्टिस्टेटचीच असल्याचा अहवाल सहाय्यक निबंधकांनी दिला आहे. बँकेने दाखवलेल्या रेकॉर्डनुसार पैसे वेगवेगळ्या शाखेतून जमा करुन मुख्य शाखेकडे चालले होते. त्यावेळी म्हणजे बुधवारी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ही 90 लाख 50 हजारांची रक्कम जप्त केली.

जप्त केलेल्या रकमेतील सर्व नोटा हजार-पाचशेच्या होत्या. शुक्रवारी रात्री उशिरा उमरगा तहसीलदारांकडे याचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.