Maharashtra Politicis News : विधानपरिषदेत आज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे यांच्याकडे निर्देश करत सदरे नावाच्या पीआयने आत्महत्या कुणामुळे केली हे स्पष्ट करण्याची मागणी केली. तर वाळू माफिया, अवैध उत्खनन केल्याचा खडसेंवर गंभीर आरोप केला. यामुळेच कुटुंबातील लोकांना 3 वर्ष जेलमध्ये राहावं लागल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. तर खडसेंकडून देखील जळगाव जिल्ह्यात वाळू उपसा आणि अवैध धंदे महाजन यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप केला. 


आज विधानसपरिषदेत गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे असा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप केले. सगळ्या जिल्ह्याला माहित आहे की, वाळूचे अवैध धंदे कोण करते असे म्हणत महाजन यांगी खडसे यांच्यावर टीका केली. चोऱ्या कोणी केल्या हे सर्वांना माहित असल्याचेही महाजन म्हणाले. 


वाळू माफिया संदर्भात माझा काही संबंध असेल तर चौकशी करा 


वाळू माफिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरु आहे. गेली पाच वर्ष झालं कोणाचं सरकार आहे. सरकार याकडं का लक्ष देत नाही असे एकनाथ खडसे यावेळी म्हणाले. वाळू माफिया संदर्भात तुम्ही बांगड्या घातल्यात का? असे खडसे म्हणाले. कापसाला तुम्ही का दर देत नाहीत? असेही खडसे यावेळी म्हणाले. मी माझे मुद्दे मांडत आहे, कोणाच्या बुडाला काही आग लागायची गरज नाही असे खडसे म्हणाले. नुसते आरोप करायचे, खोटे गुन्हे दाखल करायचे काम सुरु असल्याचे खडसे म्हणाले. वाळू माफिया संदर्भात माझा काही संबंध असेल तर चौकशी करा असेही खडसे म्हणाले. 


जळगाव जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या


 जळगाव जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. ग्रामीण भागात देखील घटना घडत आहेत. दिवसाढवळ्या खून होत आहेत, याची देखील चौकशी झाली पाहिजे असेही खडसे म्हणाले. या गुन्ह्यातील आरोपी पकडले जात नाहीत, हे गंभीर असल्याचे खडसे म्हणाले. वाळूमाफियांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली आहे. वारंवार असे प्रकार जळगाव जिल्ह्यात घडत असल्याचे खडसे म्हणाले. अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे प्रकार होत आहेत. वाळूच धोरण बदललं पाहिजे नाहीतर या घटना अशाच वाढत जातील असे खडसे म्हणाले. वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे खडसे म्हणाले. पण सरकार यावर कारवाई करत नाही. कारण सरकारला वाटते आपल्याच पदाधिकाऱ्यांवर कारवाई होते असेही खरडे म्हणाले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे खडसे म्हणाले.