''इंदापूर विधानसभेची निवडणूक आपण लढवणार आहोत. आपल्या उमेदवारीची काळजी काँग्रेस पक्ष घेईल,'' असं प्रत्युत्तर हर्षवर्धन पाटील यांनी दिलं आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या दाव्याला प्रत्युत्तर दिलं.
''आपल्या पक्षाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी जे वक्तव्य केलं ते त्यांच्या पक्षाचं मत होतं, काँग्रेस पक्षाचं नव्हतं. जागा वाटपाची चर्चा अथवा धोरण वरिष्ठ पातळीवर ठरणार आहे. ते फक्त एका इंदापूरच्या जागेपुरतं मर्यादित नसेल. ज्या त्या ठिकाणची परिस्थिती बघून ते निश्चित होणार आहे,'' असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले.
आघाडी नाही झाली तरी चालेल, पण जागा सोडणार नाही : अजित पवार
''वाट्टेल ते झालं तरी इंदापूरची जागा राष्ट्रवादीला देणार, भले आघाडी झाली नाही तरी बेहत्तर,'' अशा शब्दात अजित पवार यांनी इंदापूर विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा हक्क सांगितला होता. गेल्या आठवड्यात इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावातील आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
अजित पवार यांनी या जागेवर आपला दावा सांगितल्यानंतर हर्षवर्धन पाटलांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. हर्षवर्धन पाटलांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेत राजकीय लढाई सुरु झाल्याचे संकेत दिले.
व्हिडीओ :