पालघर : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सहा ठिकाणी तर वसई विरार महानगर पालिका क्षेत्रात काही प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेनमेंट झोन) घोषित करण्यात आले होते. या क्षेत्रात आढळलेले रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. प्रतिबंधित क्षेत्राचा कालावधी 15 दिवसांच्या पार गेला आहे. तर पावसाळा जवळ येत असल्याने नागरिकांची घर दुरुस्ती, घर साकारणे तसेच इतर काम ही रखडली आहेत. त्यामुळे नियमांमध्ये शिथिलता देण्याची मागणी नागरिक करत आहेत.  मात्र आजवरच्या सर्वेक्षणातून संक्रमणाचा संसर्गाचा इतर ठिकाणी वाढणारा वेग पाहता सावधगिरीचा उपाय योजना म्हणून प्रतिबंधात्मक क्षेत्र अजूनही कायम ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून देण्यात आली.


जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही प्रतिबंधात्मक क्षेत्रांच्या अंतिम सर्वेक्षण सुरू आहे. त्यादरम्यान आजाराची लक्षणे आढळून न आल्यास प्रतिबंधात्मक क्षेत्र शिथिल करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. पालघर ग्रामीण जिल्ह्यात सध्या 13 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी बरे होऊन परतणाऱ्या रुग्णांचे 14 आणि 15 दिवसांचे घशाचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले असून त्यांचे अहवाल नकारात्मक आल्यानंतर अशा रुग्णांना घरी सोडून देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

सफाळे, उसरणी व काटाळे (तालुका पालघर) तसेच दसरापाडा (गंजाड), कासा व रानशेत— सारणी (तालुका डहाणू) अशा सहा ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत. तर वाडा शहर हा नवीन कंटेंटमेंट झोन तयार झाला आहे.

यापैकी उसरणी, काटाळे व कासा येथील रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. इतर ठिकाणच्या रुग्णाला येत्या दोन दिवसांत घरी पाठवणे अपेक्षित आहे. या पैकी बहुतांश ठिकाणी प्रतिबंध क्षेत्र लागू होऊन 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच या भागात नव्याने रुग्ण न आढळल्याने प्रतिबंधित क्षेत्रात शिथिलता देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

शिथिलता देण्यास अडचण काय?

पालघर आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता कोरोना संसर्गाचा रुग्ण आढळल्यानंतर त्या परिसरातील घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेंक्षण आणि पाहणी केली जाते. यावेळेला करोना संसर्गाची लक्षण असणारे काही रुग्ण आढळल्याचे दिसून आले. अशा प्रतिबंधित क्षेत्राच्या गावांमधील सर्वेक्षण आणि पाहणीदरम्यान अलगीकरणाच्या भीतीपोटी अनेकदा वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संशयितांची माहिती दिली जात नाही.  या क्षेत्रातील स्वत:हून आजाराची लक्षणे सांगणाऱ्या रुग्णांची संख्या मर्यादित आहे.

वसई-विरारमधील 27 ठिकाणची बंदी उठवली

वसई विरार शहरातील रुग्णसंख्या ही मंगळवार संध्याकाळ पर्यंत १६० वर पोहोचली आहे. त्यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये वाढ होत आहे. सध्या शहरात ८८ प्रतिबंधीत क्षेत्रे आहेत. ज्या ठिकाणी रुग्ण आढळला तो परिसर प्रतिबंधित केला जातो. तेथील दुकाने बंद केली जातात आणि नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई केली जाते. त्याच भागात दुसरा रुग्ण आढळला नाही तर साधारण १४ दिवसांनतर तेथील प्रतिबंधित क्षेत्र हटवले जाते. आजवर पालिकेने २७ ठिकाणीची प्रतिबंधित क्षेत्र हटविल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली