CIDCO Lottery 2022 : परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांचे नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नवी मुंबईत सिडकोच्यावतीने 5 हजार 730 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत 26 जानेवारीपासून लॉटरीसाठी नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही माहिती दिली. नवी मुंबईतील कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी आदी ठिकाणी ही घरे असणार आहेत.


नवी मुंबईत सिडकोच्यावतीने पाच हजार घरांची ‘महागृहनिर्माण’योजना आहे. या घरकुल योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी येथे घरे उपलब्ध होणार आहेत. घरांच्या लॉटरीसाठी 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. 24 फेब्रुवारी 2022 रात्री आठ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.  सिडकोच्या https://lottery.cidcoindia.com/App/  या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. गुरुवार 27 जानेवारी 2022, दुपारी 12 वाजल्यापासून घरांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.  25 फेब्रुवारी रात्री 11.59 वाजेपर्यंत घरांसाठी अर्ज करता येणार आहेत. 


५७३० घरांपैकी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत १५२४ घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी तर ४२०६ सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. कोरोना महासाथीनंतर ही लॉटरी निघणार असल्यामुळे घर खरेदीच्या प्रतिक्षेत असलेल्यांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. 


म्हाडाची घरांसाठी लॉटरी 


जुलै महिन्यांत गोरेगाव परिसरात 4 हजार घरांची लॉटरी काढणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून याबाबतची तयारी सुरू झाली आहे. मुंबईच्या उपनगरात म्हाडाकडून सर्वसामान्यांना परवडतील अशी वन बीएचके घरी उभारली जात आहेत. 


विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मंडळाकडून काढण्यात येणाऱ्या घरांच्या लॉटरीत अत्यल्प गटाकरिता सुमारे दोन हजार घरांचा समावेश असणार आहे. पहाडी गोरेगाव येथे वन बीएचके आकाराची असणारी ही घरे अगदी परवडणाऱ्या किंमतीत म्हणजे 22 लाखांत उपलब्ध होणार  आहेत. 


गोरेगाव येथे बांधण्यात येणारी 1947 घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवूनच हा प्रकल्प  साकारला  जात आहे. तर लॉटरीतील उर्वरित घरे ही उन्नत नगर येथे असणार आहेत. गोरेगाव पश्चिम येथील बांगूर नगर परिसरातील पहाडी गोरेगावमध्ये 23 माळ्याच्या सात इमारती उभ्या राहत आहेत. यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी 1 हजार 239 घरे असणार आहेत. सुमारे 322.60 चौरस फूट असे घराचे क्षेत्रफळ असणार आहे. घराची किंमत 22 लाख असेल. मध्यम उत्पन्न गटासाठी 227 घरे आहेत. क्षेत्रफळ ७९४.३१ चौरस फूट असेल. याची किंमत 56 लाख आहे. उच्च उत्पन्न गटासाठी 105 घरे. त्याचे क्षेत्रफळ 178.56  चौरस फूट असेल. याची किंमत 69 लाख असेल.