मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित एन्काऊंटर प्रकरणाच्या तपासाबाबत सीआयडी गंभीर नाही असं निरीक्षण नोंदवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच 20 जानेवारीपर्यंत न्यायालयीन चौकशीकरता पोलीस तपासाची सगळी कागदपत्रे जमा करण्याचे सीआयडीला निर्देश देण्यात आले. अक्षय शिंदेच्या वडिलांनी एन्काऊंटर बनावट असल्याचा आरोप करत हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरील पुढील सुनावणी 20 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
बदलापुरातील एका नामांकित शाळेत ऑगस्ट महिन्यात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. त्यानंतर या प्रकरणाचा सीआयडी तपास सुरू झाला. त्यावरून उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
इतके दिवस झाले तरी राज्य सरकार तपासाबाबत गंभीर दिसत नाही अस उच्च न्यायालयाने म्हटलं. तुमच्याकडून काय अपेक्षा होती, आणि तुम्ही काय करताय? अशा शब्दात उच्च न्यायालयाने सीआयडीला फटकारलं. त्यावर या प्रकरणात अजूनही साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचीच प्रक्रिया सुरू असल्याची सीआयडीकडून कोर्टात माहिती देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी 20 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली.
इतर आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर
दरम्यान, हा एन्काऊंटर फेक असल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या वडिलांनी केला. तसेच ज्या शाळेत हे अत्याचाराचे प्रकरण घडले त्या ठिकाणी या आधीही अशा प्रकारची अनेक प्रकरणं घडल्याची चर्चा आहे. अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात शाळा व्यवस्थापनेतील इतर अनेकजण सामील असल्याचा आरोप केला जातो. अक्षय शिंदे त्या सर्वांची नावं उघड करणार होता, म्हणून त्याचा एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप शिंदेच्या वडिलांनी केला.
बदलापूर प्रकरणातील संस्थाचालकांना जामीन
बदलापुरातील शाळेत घडलेल्या चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या दोघांनाही एक महिन्यानंतर पोलिसांनी कर्जत परिसरातून बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर या दोघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला. तसेच या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनादेखील 25 हजारांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
पीडित मुलीची आई उच्च न्यायालयात जाणार
बदलापूर अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी शाळेच्या ट्रस्टीला जामीन मिळाल्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती दिली. याबाबत पीडित मुलीच्या आईने उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.