अहमदनगर : सीआयडीकडून अहमदनगरमधील केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. अखेरच्या क्षणी 90 व्या दिवशी जिल्हा सत्र न्यायालयात हे 1366 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलं.
दहा आरोपींपैकी आठ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि बाळासाहेब कोतकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. आरोपपत्रात दोघांचा सध्या समावेश करण्यात आलेला नाही, मात्र पुरवणी दोषारोपपत्रावर भवितव्य ठरणार आहे.
तपासात निष्पन्न झाल्यास पुरवणी आरोपपत्रात नावं समावेश होण्याची तरतूद करण्यात आली असल्याने संग्राम जगताप यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. तर भानुदास कोतकर, संदीप गुंजाळ, विशाल कोतकर, रवींद्र खोल्लम, बाबासाहेब केदार, भानुदास महादेव कोतकर, संदीप गिऱ्हे आणि महावीर मोकळ यांच्या नावाचा आरोपपत्रात समावेश आहे.
हत्या आणि हत्याचा कट, आर्म अॅक्टसह आरोपपत्र दाखल करण्यात आलं.
काय आहे प्रकरण?
केडगाव शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची सात एप्रिलला गोळ्या झाडून आणि गुप्तीने गळा चिरुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या राजकीय वादातून ही हत्या झाली होती. संदीप गुंजाळसह चौघांनी हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी गुंजाळला अटक करण्यात आली होती.
तपासासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली होती. मात्र मृतांच्या कुटुंबीयांनी पोलीस तपासावर आक्षेप घेतल्याने तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला.
हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, वडील आमदार अरुण जगताप आणि सासरे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, व्याही भानुदास कोतकर, संदीप कोतकर आणि विशाल कोतकरसह 36 जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्या, हत्येच्या कटासह इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी आमदार संग्राम जगतापसह दहा जण न्यायालयीन कोठडीत आहेत. संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर, बाळासाहेब कोतकर, बी एम कोतकर, रवी खोल्लम, संदिप गिर्हे, महावीर मोकळ, विशाल कोतकर आणि बाबासाहेब केदार न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र या प्रकरणी आमदार अरुण जगताप यांना अद्याप अटक झाली नसून ते फरार आहेत.
महापालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विशाल कोतकर निवडून आला होता. मात्र सायंकाळी दोघा शिवसैनिकांची निर्घृणपणे हत्या झाली. यानंतर शिवसैनिकांनी केडगावला रस्ता रोको आंदोलन करुन मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह घटनास्थळीच होते.
यानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशी करण्यात आली. यावेळी जमावाने एसपी कार्यालयाची तोडफोड करुन संग्राम जगताप यांना घेऊन गेले होते.
या प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली होती.
केडगाव शिवसैनिकांची हत्या प्रकरण : आरोपपत्रात संग्राम जगतापांचं नाव नाही
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Jul 2018 06:08 PM (IST)
तपासात निष्पन्न झाल्यास पुरवणी आरोपपत्रात नावं समावेश होण्याची तरतूद करण्यात आली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर टांगती तलवार कायम आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -