सांगली : सांगली येथे चौगुले हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. चौगुले हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आला असल्याचे सांगून डॉ. रूपाली चौगुले यांना अटक करण्यात आली आहे. तर डॉ. विजय चौगुले यांच्या अटकेची कारवाई चालू असून लवकरच त्यांनाही अटक होईल, असे जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी सांगितले. या प्रकरणामध्ये कोणतीही कायदेशीर त्रुटी राहू नये, यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेवून सदर प्रकरण न्यायालयात सक्षमपणे मांडले जावे, यासाठी दक्षता घ्यावी असे सांगून चौगुले दाम्पत्य हे शासकीय सेवेत कार्यरत असल्याने त्यांच्यावरील विभागीय चौकशीसाठीचाही प्रस्ताव महापालिकेने त्वरित शासनाला सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. तसेच, डॉ. रूपाली चौगुले व डॉ. विजय चौगुले यांची सनद रद्द करण्यासाठी मेडिकल कॉऊन्सिलला प्रस्ताव पाठविण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. सांगली येथील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये झालेल्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील डॉ. रुपाली चौगुले व डॉ. विजय चौगुले हे दोन्ही शासकीय अधिकारी असल्याने त्यांच्यावरील कारवाईसाठी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शासनाने या प्रकरणाची गांर्भियाने दखल घेतली असून आरोग्य विभागाकडून याबाबत तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिली. लिंग निदान चाचणी करुन स्त्री गर्भपातासाठी शस्त्रक्रिया झाल्याचे अद्याप निष्पन्न झाले नाही, त्या दृष्टीनेही तपास चालू आहे, असे तपास अधिकारी पोलीस उपअधिक्षक अशोक वीरकर यांनी सांगितले असून, कारवाईत मिळालेल्या साहित्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे. या प्रकरणाशी संबधित असलेल्या प्रत्येक पैलूचा बारकाईने तपास करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. काय आहे प्रकरण? सांगली शहरात अवैध गर्भपात सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सांगली महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांनी मिळून संयुक्तरीत्या चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकत हा प्रकार उजेडात आणला आहे. गेल्या एक वर्षांपासून विनापरवाना गर्भपात करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. यात हॉस्पिटलमधून संशयास्पद कागदपत्रे आणि औषधे आढळून आली आहेत. त्याचबरोबर या छाप्यामध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि दारूच्या बाटल्या ही हॉस्पिटलमध्ये सापडल्या आहेत. तसेच, हॉस्पिटलच्या कागदपत्रांची तपासणी केली असता या ठिकाणी सहा गर्भपात केल्याचे आतापर्यत समोर आलेले आहे. आणखी किती अवैध गर्भपात करण्यात आले आहेत याचा तपास सुरू असून या प्रकरणी डॉक्टरांसह तिघा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गर्भपात प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तिघांवर गुन्हे दाखलन करण्यात आले असून स्वप्नील जमदाडे, विजयकुमार चौगुले, रुपाली चौगुले अशी डॉक्टरांची नावे आहेत. दरम्यान हॉस्पिटलची तपासणी सुरु झाल्यानंतर हॉस्पिटलकडून काही औषधपत्रे जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या पोलिसांनी याठिकाणचे औषधे व रोख रक्कम जप्त केली आहे. तर या हॉस्पिटलमध्ये आणखी बेकायदेशीर गर्भपात केल्याची शक्यता वर्तवली जात असून याबाबत आता तपास सुरु करण्यात आला आहे. गेल्या वर्षी म्हैसाळ येतील गर्भपातामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक हादरुन गेला होता आणि पुन्हा एक वर्षानंतर सांगलीमध्ये अवैध गर्भपाताचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.