Eknath Shinde : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज करणे आणखी सुलभ होणार आहे. निधीच्या योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशांनुसार टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केलं जाणार आहे. टास्क फोर्स सदस्य डॉ. संजय ओक, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ.संगिता रावत यांच्या मार्गदर्शनाखाली टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केलं जाणार आहे.    


राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तात्काळ अर्ज सादर करता यावेत, यासाठी ऑनलाईन अर्ज पद्धती अधिक सुलभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार या कक्षाचे काम जास्तीत जास्त गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानुसार या कक्षाचे अॅप्लिकेशन आणि टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी वैद्यकीय समितीची बैठक आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते. या बैठकीत खारगे यांनी कक्षाचा कामाचा आढावा घेतला आणि कामकाजाबाबत काही सूचना दिल्या. 


निधी कक्षाचे प्रमुख श्री. चिवटे यांनी बैठकीत सांगितले की, ऑनलाईन अॅप्लिकेशन तसेच वेबसाईटद्वारे रुग्णांचे अर्ज तत्काळ उपलब्ध होणारी यंत्रणा तयार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे मोबाईल अॅप्लीकेशन तसेच मदत व मार्गदर्शनासाठी टोल फ्री नंबर लवकरच सुरु करण्यात येईल. तसेच योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व शासकीय जिल्हा रूग्णालयांचे शल्य चिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठता यांनी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. 


वैद्यकीय सहाय्यता निधीमधील रुग्णालयांची संख्या वाढविणार
राज्यातील जास्तीत जास्त रुग्णांना सहाय्यता उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये जास्तीत जास्त रुग्णालयांचा समावेश (पॅनल) करण्यात येणार आहे. याकरीता रूग्णालयाने अर्ज सादर करावे यासाठी रूग्णालयांना प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच रुग्णांलयांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांच्यापर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचवली जाणार आहे. राज्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष पोहचवास असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचे चिवटे यांनी सांगितले.  


महत्वाच्या बातम्या :